बंदर व गोदी कामगारांचे नेते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते डॉ. शांती पटेल (९२) यांचे शुक्रवारी सकाळी माहिम येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणीने गांधीवादी विचारांचा कृतीतून आदर्श निर्माण करणाऱ्या नेत्याच्या निधनाबद्दल कामगार चळवळ आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेसमधील समाजवादी प्रवाहातील ते एक नेते होते. अशोक मेहता, जयप्रकाश नारायण आदींशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. १९५२ ते १९७३ असे २१ वर्षे ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक होते. याच कालावधीत त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषविले. १९७७ मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात ते सहभागी झाले. मुंबई जनता पक्षाचे ते काही काळ अध्यक्ष होते. १९७८ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जनता पक्षाला नेत्रदीपक यश मिळाले होते. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर निवड झाली. अलीकडच्या काळात मात्र राजकारणापासून ते अलिप्त राहिले होते. कामगार चळवळीत ते अखेपर्यंत कार्यरत राहिले. मुंबई पोर्ट ट्रस्टचे ते ६२ वर्षे विश्वस्त होते. अलीकडेच त्यांनी त्यातून आपली निवृत्ती जाहीर करून आपले एक ज्येष्ठ सहकारी सुधाकर अपराज यांना विश्वस्त म्हणून काम करण्याची संधी मिळवून दिली. वय झाले तरी ते दररोज माझगाव येथील युनियनच्या कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असत. शुक्रवारी सायंकाळी दादर येथील स्माशनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  
अल्पपरिचय : कृतीशील गांधीवादी
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. शांती पटेल यांच्या निधनामुळे कामगारांचे समर्थ नेतृत्व हरपले आहे. उमेदीच्या काळापासून त्यांनी बंदर व गोदी कामगारांचे नेतृत्व केले. राष्ट्रीय पातळीवरील हिंदू मजदूर सभेचे ते एक संस्थापक होते. या संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. गुजरातमधील नवाबाच्या अंमलाखालील खेडा जिल्ह्य़ातील वीरपूर या गावात शांती पटेल यांचा ८ ऑगस्ट १९२२ रोजी जन्म झाला. वैद्यकीय पदवीचे शिक्षणानंतर त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. गांधीजींच्या विचाराने भारावून गेलेल्या पटेल यांनी १९४२ च्या चलेजाव चळवळीत स्वत:ला झोकून दिले. पुढे ते राजकारणात व कामगार चळवळीत उतरले. त्यांनी बंदर व गोदी कामगारांचे समर्थ नेतृत्व केले. कामगार चळवळीत काम करीत असताना त्यांनी आंदोलनापेक्षा सत्याग्रही मार्गाने, व्यवस्थापनाशी चर्चा-संवाद साधून आणि फार क्वचितच अगदी निर्णायक क्षणी संपासारख्या घटनात्मक आयुधांचा वापर करून कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran freedom fighter and ex mumbai mayor shanti patel passes away
First published on: 14-06-2014 at 12:59 IST