ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांचं निधन झालं आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर मुलुंड या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कवयित्री नीरजा या म. सु. पाटील यांची कन्या आहेत. डॉ. म. सु. पाटील यांच्या सर्जन प्रेरणा आणि कवित्वशोध या समीक्षाग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. मराठी साहित्य, मराठी भाषा, साहित्यव्यवहार याविषयी असलेल्या प्रेमापोटी म.सु. पाटील हे गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ समीक्षा लेखन करत होते. त्यांच्या जाण्याणे मराठी समीक्षाविश्वातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपलं आहे.

मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. १९४६ ते १९६४ या कालावधीत त्यांनी गिरणी कामगार, कारकून आणि शिक्षक म्हणूनही काम केलं. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘लांबा उगवे आगरी’ या आत्मकथनातून त्यांचा शून्य ते शिखर हा प्रवास किती खडतर होता, याची सर्वाना कल्पना आली. १९६९ नंतर ते मनमाडच्या महाविद्यालयात प्राचार्य झाले. तिथल्या त्यांच्या वीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी रेल्वेचे जंक्शन अशी ओळख असलेल्या मनमाडला साहित्याच्या नकाशावर आणले. महाविद्यालयात अनेक नामवंत कवी, समीक्षकांना आमंत्रित करणे, चर्चासत्रे आयोजित करणे, नाशिक जिल्ह्य़ातील मराठीच्या प्राध्यापकांचे एक अभ्यासमंडळ स्थापन करणे या व अशा अनेक साहित्यविषयक उपक्रमांतून त्यांनी त्या परिसरातील साहित्यप्रेमींमध्ये साहित्यजाण रुजवली.

१९८० नंतरच्या मराठी समीक्षाविश्वात त्यांच्या समीक्षेचा अमीट ठसा उमटलेला आहे. १९८१ मध्ये त्यांचे ‘दलित कविता’ प्रसिद्ध झाले. पुढच्याच वर्षी ‘अक्षरवाटा’, मग १९८९ मध्ये ‘आदिबंधात्मक समीक्षा’, ‘सदानंद रेगे यांचे काव्यविश्व’, ‘बालकवींचे काव्यविश्व’, १९९० साली ‘भारतीयांचा साहित्यविचार’, १९९९ साली ‘कवितेचा रूपशोध’, २००१ साली ‘साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध’ आणि ‘इंदिरा यांचे काव्यविश्व’, २००४ साली ‘ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध’, ‘तुकाराम : अंतर्बाह्य़ संघर्षांची अनुभवरूपे’, २००६ साली ‘ज्ञानेश्वरीचा काव्यबंध’, तर ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ (२०१३) तसेच ‘बदलते कविसंवेदन’ या त्यांच्या समीक्षाग्रंथांतून त्यांची समीक्षादृष्टी आणि त्यांचा साहित्यविचार व्यक्त झाला आहे. असे हे थोर व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.