चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरीदादा जुकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. सुमारे ६० वर्षे ते रंगमंच, मोठा पडदा आणि छोटा पडदा या माध्यमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा मेक अप करत होते. पंढरीदादा हे नाव त्यांची ओळखच झाली होती.

राजकमल कला मंदिर, यशराज फिल्मस्, बालाजी टेलिफिल्म्स या आणि अनेक प्रॉडक्शन हाऊससाठी त्यांनी काम केलं. अगदी कृष्णधवल काळापासून ते सिनेसृष्टीत कार्यरत होते. मधुबाला, मीनाकुमारी यांच्यापासून ते जुही चावला, माधुरी दीक्षित यांच्या पर्यंत अनेक अभिनेत्रींचा आणि अभिनेत्यांचा मेक अप त्यांनी केला होता. २०१३ मध्ये त्यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं. राज कपूर, अशोक कुमार, देव आनंद, राजेश खन्ना, सुनील दत्त, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, करीना कपूर यांचाही मेकअप पंढरीदादांनी केला होता. रंगभूषा म्हणजे फक्त चेहऱ्याला रंग लावणं नाही तर त्यात पात्राचं व्यक्तिमत्त्व रंगभूषेतून उभं राहिलं पाहिजे असं पंढरीदादा नेहमी सांगत असत.