News Flash

ज्येष्ठ लेखिका मीना देशपांडे यांचे निधन

मीना या दिवंगत साहित्यिक-पत्रकार आचार्य अत्रे यांच्या कन्या होत.

(संग्रहित छायाचित्र)

ज्येष्ठ लेखिका मीना देशपांडे यांचे सोमवारी पहाटे अमेरिके त निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. करोनाची बाधा झाल्याने गेले १५ दिवस त्या रुग्णालयात दाखल होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. मीना या दिवंगत साहित्यिक-पत्रकार आचार्य अत्रे यांच्या कन्या होत.

मीना यांच्यावर बालपणापासूनच साहित्याचे आणि समाजकारणाचे संस्कार झाले. लेखिका म्हणून त्यांची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जाणीव सतत विकसित होत राहिली. आचार्य अत्रे यांनी ‘कऱ्हेचे पाणी’ हे त्यांचे १९६० सालापर्यंतचे आत्मचरित्र लिहिले होते. त्याचे पुढील तीन खंड मीना यांनी लिहिले. या आत्मचरित्रातील आणि अत्रे यांच्याच ‘मी कसा झालो’ या पुस्तकातील निवडक उताऱ्यांचे चित्रमय संकलन त्यांनी ‘मी असा झालो’ या पुस्तकात केले आहे.

त्यांचे ‘पप्पा – एक महाकाव्य’ हा सदरलेखन संग्रह, ‘मॅरिलिन मन्रो’ ही अनुवादित कादंबरी, ‘ये तारुण्या ये’ हा कथासंग्रह, ‘अश्रूंचे नाते’ असे साहित्य प्रकाशित झाले आहे. अत्रे यांच्या लेखांविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह असलेले ‘आचार्य अत्रे – प्रतिभा आणि प्रतिमा’ हे पुस्तक त्यांनी संपादित केले. मीना यांच्या ‘महासंग्राम’ आणि ‘हुतात्मा’ या कादंबऱ्यांना राज्य शासनाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. ‘हुतात्मा’ या कादंबरीवर वेबमालिकाही प्रसारित झाली आहे. काही काळ मीना यांनी ‘अत्रे थिएटर्स’ या नाटय़संस्थेचे व्यवस्थापनही पाहिले. १९९८ साली अत्रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी संकल्पित आणि दिग्दर्शित केलेला ‘हसू आणि आसू’ हा कार्यक्रमही खूप गाजला होता.

कन्या डॉ. प्रिया घमंडे यांची प्रकृती ठिक नसल्याने मीनाताई नोव्हेंबर महिन्यातच अमेरिके ला गेल्या होत्या. मात्र, टाळेबंदीमुळे त्या तेथेच अडकल्या. मुंबईत त्यांचे निवासस्थान असलेल्या इमारतीत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यांनी अमेरिकेतच राहण्याचा निर्णय घेतला.

मीना यांची मुलगी आणि जावई डॉक्टर आहेत. मुलगाही अमेरिकेतच आहे. मीना यांचे पती सुधाकर देशपांडे वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक तसेच उपप्राचार्य होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:23 am

Web Title: veteran writer meena deshpande passes away abn 97
Next Stories
1 एसटीतील ३२ कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू
2 कर्तृत्ववान नवदुर्गाचा शोध
3 Coronavirus : दररोज १४ हजार चाचण्यांचे लक्ष्य
Just Now!
X