25 January 2020

News Flash

खाऊखुशाल : चटकदार ‘विदर्भ वडापाव’

गेल्या दोन वर्षांपासून विदर्भ वडापाव पार्लेकरांसाठी खाण्याचं एक हक्काचं ठिकाण झालं आहे.

महाराष्ट्रात जशी बारा मैलांवर भाषा बदलते तशी तेथील खाद्यसंस्कृतीही बदलते. त्यामुळे प्रत्येक प्रदेशाची एक वेगळी खाद्यसंस्कृतीही आहे. विदर्भही त्यामध्ये मागे नाही. विदर्भातील पदार्थ म्हणजे तिखट असा आपला समज असतो. पण त्याला फाटा देत मुंबईची खास ओळख असलेल्या बटाटा वडाला वेगळा आयाम देत विदर्भ वडापावने गेली चार दशकं मुंबईकरांना वेड लावलंय. फक्त वडाच नव्हे तर विदर्भातील शेगावची कचोरी आणि मिसळीचाही त्यात समावेश आहे. सुनील वाघ यांच्या वडिलांनी २ फेब्रुवारी १९७२ ला अंधेरी येथील वैभव हॉटेलशेजारी विदर्भ वडापाव या नावाने वडापावची गाडी सुरू केली होती. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर विदर्भ वडापावने सर्व वयोगटांतील लोकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून विदर्भ वडापाव पार्लेकरांसाठी खाण्याचं एक हक्काचं ठिकाण झालं आहे.

नावामध्येच वडापाव असल्याने यांच्या वडय़ाचं वेगळेपण काय, हा प्रश्न सहज पडू शकतो. हे वेगळेपण चव घेतल्यावर तर तुमच्या लक्षात येईलच, पण पुढील गोष्टींमुळे ती वेगळी चव अधिकच अधोरेखित होईल. महाग असला तरी येथे वडय़ासाठी जुना बटाटा वापरला जातो. नवीन बटाटय़ाला नख मारलं की त्यातून पाणी येतं, पण जुन्या बटाटय़ाचं तसं नसतं आणि त्यामध्येच या वडय़ाची चव दडलेली आहे. सुनील यांच्या मते वडय़ाच्या आतल्या भाजीला तेलाची वाफ लागली पाहिजे त्यानेही चवीत फरक पडतो. त्यासाठी वडा हा नेहमी चपटा असावा. तुम्ही नख लावल्याबरोबर त्यावरचं आवरण बाजूला झालं पाहिजे. कारण बटाटा वडा खाताना त्याचं बेसन लागता कामा नये. त्यामुळे विदर्भ वडा उघडल्यावर त्यातून सुगंध येतो. त्याचं आणखीन एक कारण म्हणजे या वडय़ामध्ये आरोग्याला गुणकारी असणारी कोथिंबीर मोठय़ा प्रमाणात वापरली जाते.

विदर्भातील प्रसिद्ध पदार्थापैकी एक शेगावची कचोरी हीदेखील विदर्भ वडापावची खासियत. कडीपत्ता, मोहरी, बडिशेप, जिरं, मूगडाळ, हळद आणि मीठ हे एकजीव केलेलं सारण बेसनाच्या गोळ्यामध्ये भरून समान आकाराची आणि प्रमाणाबाहेर फुगून टम्म न होणारी कचोरी आकर्षक तर दिसतेच, पण खातानाही मिटक्या मारत खावी अशीच आहे.

चवळीवडा हा अतिशय वेगळा आणि पौष्टिक पदार्थ येथे मिळतो. पालेभाज्यांपैकी चवळी, पालक, मेथी, हिरव्या कांद्याची पात आणि मूगडाळ यांच्या मिश्रणातून हा चवळीवडा तयार होतो. पण तो तयार करण्याची पद्धत फार वेगळी आहे. सर्व पालेभाज्या, भिजवलेली मूगडाळ, चण्याचं पीठ आणि चवीनुसार मीठ एकजीव केल्यानंतर त्याचे लहान गोळे तयार केले जातात. हे गोळे हलकेसे तळून घेतल्यानंतर बाहेर काढून त्यांना हाताने पुन्हा एकदा गोल चपटा आकार दिला जातो आणि ते पुन्हा एकदा कढईत सोडले जातात. यामुळे काय वेगळं घडत असेल तर त्यामुळे हा वडा खुसखुशीत होतो. त्यातील भाज्या नरम आणि डाळ कुरकुरीत लागते. केवळ १२ रुपयांमध्ये मिळणाऱ्या या तळहाताएवढय़ा वडय़ाचं कौतुक पाल्र्यातील अनेक पालकांना आहे. त्यामुळे पालेभाज्यांपासून तयार केलेला हा वडा खाण्यासाठी अनेक पालक आवर्जून आपल्या पाल्यांना पैसे देतात. मूगडाळ भजीसुद्धा खावी, तीसुद्धा विदर्भ वडापावमध्ये आणि तीसुद्धा थंड झालेली. इतर ठिकाणी थंड भजी आपल्याला चालत नाहीत; परंतु इथे लोक मुख्यत: थंड भजी खायला येतात. थंड झाल्यावरही पिठाळ न लागणारी आणि चविष्ट भजी खाल्ल्याशिवाय त्यामागचं गुपित कळणार नाही म्हणा.

तळलेल्या पदार्थासोबतच आवर्जून चाखण्यासारखा पदार्थ म्हणजे मिसळ-पाव. र्तीवाली मटकीची उसळ, त्यामध्ये शेवयांचा फरसाण आणि कोथिंबीर. सोबतीला कांदा, लिंबू आहेच. पण दिसायला साधीच दिसणारी ही मिसळ चवीला मात्र फर्मास आहे. तिखट असली तरी त्या तिखटाचा त्या दिवशी काय, दुसऱ्या दिवशीही त्रास होत नाही. नुसतीच मिसळ खा किंवा पावासोबत, चॉइस तुमचा आहे.

हाताच्या बोटावर मोजता येतील असे मोजकेच पदार्थ येथे मिळतात. त्यामुळे ते ताजेच देण्याचा सुनील यांचा प्रयत्न असतो. एवढंच काय, चटण्यादेखील रोज तयार केल्या जातात. त्यापैकी गोड चटणी ही विशेष प्रसिद्ध आणि लोकांच्या आवडीची आहे. कारण ती काळा गूळ आणि काळ्या चिंचेपासून तयार केली जाते. त्याव्यतिरिक्त या चटणीत काहीही टाकलं जात नाही. वडापावसोबत, समोसा, कांदा भजी, मूगडाळ भजी, बटाटा भजी, मिरची भजी, बटर वडापाव, मिसळ-पाव, उसळ-पाव आणि वडा-उसळ-पाव हे पदार्थ आणि ताक, लस्सी, कोकम सरबत ही पेये हेदेखील उपलब्ध आहेत.

वयोवृद्ध मंडळी आणि शाळा, महाविद्यालयांतील मुलांवर सुनील यांचं विशेष प्रेम आहे. शाळेतील आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आयकार्ड दाखवलं की त्यांना वडापाववर दोन रुपये सूट मिळते. येथे बसून गप्पा मारत खाण्यासाठी ऐसपैस जागा आहे, पण शंभर रुपयांच्या पुढे तुमची ऑर्डर असेल तर संपूर्ण विलेपाल्र्यात कुठेही फ्री होम डिलिव्हरी केली जाते. इतरांना मात्र तिथे जाऊनच सर्व पदार्थ चाखावे लागतील.

विदर्भ वडापाव

  • कुठे ?- के./९३८ (१), सूर्य निवास, राम मंदिर मार्ग, टिळक मंदिरशेजारी, विलेपार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७.
  • कधी ? – सोमवार ते रविवार सकाळी ७.३० ते रात्री १० वाजेपर्यंत.

@nprashant

First Published on May 13, 2017 2:47 am

Web Title: vidarbha vada pav vile parle
Next Stories
1 मुंबई बडी बांका : भामटय़ांचा बाजार
2 पेट टॉक : आमचा श्वान सरस बाई
3 सोसायटय़ांच्या मनमानीला लगाम
Just Now!
X