आघाडी सरकारच्या काळात विदर्भाच्या मुद्दय़ावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येत असत. भाजप सरकारने नागपूरला झुकते माप दिल्याने वऱ्हाड म्हणजेच अमरावती, अकोला परिसरांतील लोकप्रतिनिधींनी विदर्भाकडून अन्याय केला जातो, असा नाराजीचा सूर लावला आहे.
विदर्भ विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र अशी विभागणी विधिमंडळात नेहमीच बघायला मिळते. राज्यात सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याने अमरावती, अकोला, बुलढाणा परिसरांत त्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. सारे प्रकल्प नागपूरलाच सुरू केले जात आहेत. अमरावती विभागाला महत्त्वच दिले जात नाही, अशी भावना विधानसभेत वीरेंद्र जगताप आणि यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या आमदारांनी बोलून दाखविली. नागपूरकडून अशीच सापत्नभावाची वागणूक मिळणार असल्यास वऱ्हाड विभाग विदर्भातून वगळा, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.  सध्या तरी नागपूरच्या वाढत्या वर्चस्वाबद्दल काँग्रेसचे आमदार बोलू लागले असले तरी अमरावती विभागातील भाजप आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपचे आमदार मात्र उघडपणे बोलण्याचे टाळतात. अमरावती विभागातून भाजपचे १८ आमदार निवडून आले, पण मंत्रिपदासाठी दोन्ही विधान परिषद सदस्यांचाच विचार झाला ही बाब आमदारांना खटकली आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी करण्यात येत असली तरी या मागणीला वऱ्हाड विभागातून कधीच पाठिंबा मिळालेला नाही.