करोना महामारीमुळे गेले अनेक महिने जनसामान्यांसाठी बंद असलेली मुंबई लोकल काही दिवसांपूर्वी सुरू झाली. आधी केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या नागरिकांसाठीच असलेली लोकल नंतर काही अटींसह महिला प्रवाशांसाठी खुली झाली. गेल्या ४ ते ५ महिन्यात लोकलमध्ये किंवा स्टेशन परिसरात काही अघटित घडल्याचे प्रकार खूप कमी घडले. पण दुर्दैवाने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस कुर्ला स्टेशन परिसरात एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला. मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर भरदिवसा एका तरुणावर चाकूहल्ला करण्यात आली. या हल्ल्यातून तो तरूण बचावला पण त्या तरूणाला गंभीर दुखापत झाली.

मुंबईतील कुर्ला स्थानकाच्या पादचारी पुलावर २८ नोव्हेंबरला, शनिवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, फय्याज नेनपुरवाला असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुर्ला पूर्वेकडील आपल्या मित्राला भेटून आल्यानंतर फय्याज रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरून पलीकडे जात होता. त्यावेळी त्याच्यावर अचानक हा हल्ला झाला. हल्लेखोराचा चेहरा कपड्याने झाकलेला होता. फय्याजची हत्या करण्याच्या किंवा त्याला गंभीर जखमी करण्याच्या उद्देशानेच हा हल्ला झाला असावा. कारण फय्याजकडे पैसे असूनही हल्लेखोराने त्याच्याकडील पैसे लुटण्याचा प्रयत्न केला नसल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हल्लेखोराने फय्याजच्या पोटावर चाकूने दोनवेळा वार केले. त्यानंतर तो तेथून कसाईवाडा परिसराच्या दिशेने पळून गेला.

पाहा व्हिडीओ-

फय्याजवर हा हल्ला दुपारी चारच्या सुमारास झाला, तेव्हा पुलावरून इतर प्रवासी ये-जा करत होते. काहींनी फय्याजवरील हल्ला झालेला पाहिला आणि तो गंभीर झाल्याचे पाहून तातडीने त्याला सायन रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर आताही उपचार सुरू आहेत मात्र आता त्याची प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात हल्लेखोरावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खटला दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक इनामदार यांनी दिली.