22 July 2019

News Flash

जय जवान गोविंदा पथकाने नवव्या थरावरून शूट केलेला हा व्हिडीओ पाहिलात का

पाहा नवव्या थरावरील गोविंदाच्या नजरेतून कसा दिसतो दहीहंडीचा थरार

'जय जवान गोविंदा पथक'

दहीहंडी उत्सव होऊन एक आठवडा झाला असला तरी सोशल नेटवर्कींगवरील त्याचा फिव्हर उतरल्याचे चित्र दिसत नाहीय. त्यातही नऊ थरांची विक्रमी हंडी एकदा नाही तर दोनदा लावणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाची तरुणाईमधील क्रेझ आहे. म्हणूनच जय जवान गोविंदा पथकाने या वर्षी लावलेल्या नऊ थरांच्या हांडीचा एक आगळावेगळा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

जय जवानने आपल्या फेसबुक पोस्टवर केलेला हा व्हिडीओ नवव्या थरावर गोविंदा कसा जातो आणि सुखरुप खाली उतरतो याबद्दलचा आहे. सर्वात वरच्या म्हणजेच नवव्या थरावर जाणाऱ्या गोविंदाच्या हेल्मेटला लावलेल्या गोप्रो प्रकारच्या कॅमेरामधून हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचे हा व्हिडीओ पाहताना लक्षात येते. हा व्हिडीओ पोस्ट करताना पथकाने, ज्या व्हिडिओची खूप लोकांनी आपल्या फॅनपेजवर मागणी केली होती तो प्रसारित करण्यात आला असल्याचे सांगितले आहे. नवव्या थरावर जाणारा गोविंदा कशाप्रकारे नवव्या थरावर जातो आणि तिथून पुन्हा खाली कसा सुरक्षितपणे उतरतो हे या व्हिडीओत आम्ही दाखवत असल्याचे पथकाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. हा व्हिडीओ शूट करण्यासाठी पार्थ चव्हाण, निखिल सोनावणे, गौरव राजे, पंकज संपकाळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मदत केल्याचे पथकाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

(व्हिडीओ सौजन्य: जय जवान गोविंदा पथक फेसबुक पेज)

जय जवानने ठाण्यामध्ये दोन जागी नऊ थरांची सलामी दिली. माथाडी नेते शिवाजी पाटील आणि स्वामी प्रतिष्ठानने घोडबंदर परिसरातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहासमोर आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच पथकाने नऊ थरांची सलामी दिली. हा व्हिडीओ याच सलामीचा आहे. तर याच पथकाने दुसऱ्यांदा नऊ थरांची सलामी नौपाडा येथील मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये दिली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थिती लावलेल्या या दहीहंडी उत्सवामध्ये आव्हाड यांनी नऊ थर लावणाऱ्या जय जवान पथकाचे विशेष कौतूक केले. नऊ थर लावणाऱ्या जय जवानला मनसेने मानाची हंडी फोडण्याचा मान दिला.

First Published on September 11, 2018 1:46 pm

Web Title: video of jaijawan govinda pathak 9 tier human pyramid at swami pratishthan thane