मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात तरुण-तरुणीला पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या ‘दादागिरी’चा सर्व स्तरांतून निषेध होऊ लागला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर, या प्रकरणात पोलिसांची काहीच चूक नसल्याचा दावा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार धुमाळ यांनी केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अंधेरी मेट्रो स्थानकाबाहेर भररस्त्यात तरुण-तरुणी भांडण सुरू असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात पोलीसांकडून या तरुण-तरुणीला बेदम मारहाण होत असल्याचे व्हिडिओत दिसते. तर, तरुणी मदतीसाठी आरडाओरड करत असताना तिच्या मदतीला कोणीही आलेलं दिसत नाही. ज्यांना मारहाण झाले ते दोघेही मालाड येथील एका कॉल सेंटरमध्ये काम करणारे आहेत. तरुणी नालासोपारा तर तरुण भायखळा येथील आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक नंदकुमार धुमाळ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून सदर तरुण-तरुणी दारुच्या नशेत होते. भररस्त्यात ते एकमेकाला मारहाण करत होते. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले, पण पोलीस ठाण्यात त्यांनी दंगा करण्यास सुरूवात केली. त्यांना पोलिसांनी केवळ नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, असे धुमाळ म्हणाले आहेत.