विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात शिवसेना आणि लोकभारतीला आपला गड कायम राखण्यात यश आले आहे. पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांनी भाजपाचे अमितकुमार मेहता यांचा ११,६११ मतांनी दणदणीत पराभव केला. तर शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत आपले वर्चस्व दाखवून दिले. हे दोन्ही मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाने प्रयत्न पणाला लावले होते. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. कपिल पाटील यांना ४०५०, शिवाजी शेंडगेंना १७३६ तर अनिल देशमुख यांना ११२४ मते मिळाली.
आरोग्यमंत्री दीपक सावंतांना उमेदवारी नाकारून पोतनीसांना संधी
यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना उमेदवारी नाकारत विलास पोतनीस यांना दिली होती. त्यामुळे याचा निकालावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेकडून हा मतदारसंघ हिसकावून घेण्याचा भाजपाने भरपूर प्रयत्न केला. परंतु, यात त्यांना यश आले नाही. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद नवलकर यांच्यापासून शिवसेनेकडे मुंबई पदवीधर मतदारसंघ आहे. गेल्या तीन दशकांपासून पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचा आमदार निवडून येतो.
विलास पोतनीस यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. पोतनीस यांना १९,४०३ मते मिळाली. तर भाजपाचे अमितकुमार मेहता यांना ७,७९२ मते मिळाली. १६,९०० मतांचा कोटा होता. त्यात पोतनीस यांनी मेहता यांचा ११,६११ मतांनी पराभव केला.
या मतदारसंघात शिवसेनेकडून विलास पोतनीस, भाजपाचे अमित मेहता, काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शेकापचे अॅड. राजेंद्र कोरडे, डॉ. दीपक पवार, जालिंदर सरोदे यांच्यासह १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
मुंबई पदवीधर मतदारसंघात सहाव्यांदा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. विधानपरिषदेत शिवसेनेचे आता एक डझन वाघ झाले, अशी प्रतिक्रिया आमदार अनिल परब यांनी विलस पोतनीस यांच्या विजयानंतर दिली.
कपिल पाटील सलग तिसऱ्यांदा विजयी
विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे कपिल पाटील हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले. त्यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांचा पराभव केला. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. परंतु, मतदारांनी त्यांना नाकारल्याचे दिसते. भाजपा पुरस्कृत अनिल देशमुख हे चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. कपिल पाटील यांना ४०५०, शिवाजी शेंडगेंना १७३६ तर अनिल देशमुख यांना ११२४ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निष्प्रभ ठरला.
मुंबई शिक्षक मतदारसंघ हा कपिल पाटील यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून ते यापूर्वी दोनवेळा निवडून आले आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी विनोद तावडे यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली होती. पण कपिल पाटील यांच्या गडाला ते धक्काही देऊ शकले नाहीत. शिवसेनेने या निवडणुकीसाठी पाकिटे वाटल्याचा तसेच शाळा संस्थाचालकांची बैठक घेतल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला होता.
मतदारांनी मतदानात कमालीचा उत्साह दाखवला होता. मतदानाच्या दिवशी मुसळधार पाऊस असतानाही तब्बल ८३.२६ टक्के मतदान झाले होते. ८ हजार जणांनी मतदान केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 1:31 am