24 September 2020

News Flash

विधान परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी

मुंडे यांच्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी राष्ट्रवादीने बीडचे संजय दौंड यांना उमेदवारी जाहीर केली.

(संग्रहित छायाचित्र)

महाविकास आघाडीची मते फोडण्याचा भाजपचा प्रयत्न; दोन जागांसाठी सत्ताधाऱ्यांची एकजूट

 

मुंबई / यवतमाळ :  राज्यात सत्ता स्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी कायम ठेवली. पण त्याच वेळी सत्ताधारी महाविकास आघाडीतील मते फोडण्यासाठीच भाजपने उमेदवार उभा करून रंगत आणली आहे. यवतमाळमध्ये शिवसेनेतच बंडखोरी झाली असून, बंडखोराने माघार घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने चुरस वाढली आहे.

विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि शिवसेनेचे तानाजी सावंत यांची विधानसभेवर निवड झाल्याने पोटनिवडणुका होत आहेत. मुंडे यांच्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी राष्ट्रवादीने बीडचे संजय दौंड यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या वतीने कोकणातील राजन तेली यांनी अर्ज दाखल केला. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांना उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्रीकांत मुनगिनवार यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेतील बंडखोरीमुळे चुरस वाढली आहे.

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या आहेत. विधानसभेतून निवडून द्यायच्या एका जागेवर राष्ट्रवादी तर यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेना निवडणूक लढवीत आहे.

यवतमाळ : यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपचे सुमीत बजोरिया यांच्यात लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी तसेच भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या मुलाला शिवसेनेने उमेदवारी दिल्याने माजी जिल्हाप्रमुखाने बंडाचे निशाण रोवले. आपण माघार घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. तसे झाल्यास पोटनिवडणुकीत रंगत येऊ शकते. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले व मंत्रिपद न दिल्याने नाराज झालेले तानाजी सावंत यांनी अलीकडेच शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपला साथ दिली होती. याचा किती फटका बसू शकतो याचा अंदाज शिवसेनेकडून घेतला जात आहे.

मते फोडण्याची भाजपची योजना

धनंजय मुंडे यांच्यामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत संख्याबळाच्या आधारे विजयाची संधी नसली तरी महाविकास आघाडीतील नाराजांची किमान १०-१५ मते फोडण्याचा प्रयत्न करण्याची योजना भाजपने आखली आहे. महाविकास आघाडीने राष्ट्रवादीचे संजय दौंड यांना मुंडे यांच्या जागेवर उमेदवारी दिली. भाजपचे १०५ व काही अपक्ष असे सुमारे ११२ ते ११४ आमदार त्यांच्याकडे आहेत. तर महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठरावावेळी १६९ मते घेऊन आपली ताकद दाखवली होती.

संख्याबळाच्या आधारे भाजपला ही निवडणूक जिंकण्याची संधी नाही हे स्पष्ट आहे. तरीही भाजपने कोकणातील राजन तेली यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेतील बरेच आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. तानाजी सावंत हेही नाराज आहेत. भाजपचे खासदार नारायण राणे यांनीही नाराज आमदारांना गळाला लावण्याची जबाबदारी घेतल्याचे समजते.

राजकीय समीकरणे कधीही बदलू शकतात. राजन तेली यांचे विविध पक्षांत मित्रत्वाचे संबंध आहेत. त्याचा काही उपयोग निश्चितपणे होईल.  -प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

शिवसेनेकडून निष्ठावंताची दखल घेतली जात नाही. काँग्रेस नेत्याच्या मुलास उमेदवारी दिली हा शिवसैनिकांचा अपमान आहे. हा अन्याय सहन करणार नाही. त्यामुळे आपली उमेदवारी कायम ठेवणार आहे.  -श्रीकांत ऊर्फ बाळासाहेब मुनगिनवार, बंडखोर शिवसेना उमेदवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 12:56 am

Web Title: vidhan parishad re election shivsena bjp akp 94
Next Stories
1 टीव्ही ब्रॉडकास्टर्सना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
2 काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
3 राहुल गांधींवर टीका केल्याने मुंबई विद्यापीठाच्या योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेची शिक्षा
Just Now!
X