२० मतदारसंघांत मतदानाच्या टक्क्यांत घसरण

गेल्या विधानसभा निवडणुकीशी तुलना करता यंदाच्या लढतीत शहरातील १६ मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढल्याचे तर २० मतदारसंघांमध्ये घसरल्याचे चित्र आहे. मतांची वाढलेली टक्केवारी विद्यमान आमदार किंवा प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षाविरोधात असते, असा सर्वसामान्य समज आहे. या पाश्र्वभूमीवर वाढलेल्या, घटलेल्या मतदानाचा फायदा, तोटा कोणाला होतो हे २४ ऑक्टोबरला स्पष्ट होईल.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा किंवा त्याआधी २०१४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा राज्यात कमी मतदान झाले. शहरी भागात विशेषत: मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात मतदारांमध्ये निरुत्साह आढळला. मुंबईचा विचार करता भांडुप पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक ५६.९६ टक्के मतदानाची तर वर्सोवा मतदारसंघात सर्वात कमी ४२.६६ टक्के मतदानाची नोंद झाली.

भांडुपमध्ये सर्वाधिक मतदान झाले असले तरी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत येथील मतदान १.६२ टक्क्यांनी वाढले आहे. वांद्रे पूर्व, मानखुर्द, मागाठाणे, चारकोप, दहिसर, चेंबूर मतदारसंघांमध्ये एक ते साडेतीन टक्के तर अंधेरी पूर्व आणि बोरिवलीमध्ये मतदानाचा टक्का काही अंशांनी वाढलेला  दिसतो.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाबाबत उत्सुकता होती. या मतदारसंघातील मतदानाचा टक्का साडेपाच टक्क्यांनी घसरला. मतदानाची टक्केवारी घसरलेल्यांपैकी वडाळा मतदारसंघ पहिल्या क्रमांकावर आहे. २०१४ च्या लढतीत येथे ६१.२९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा येथे ५३.०८ टक्के मतदान झाले. मधल्या पाच वर्षांमध्ये येथे ६,७८३ मतांची भर पडली आहे. वडाळा, वरळीपाठोपाठ १० मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का घसरला आहे. गोरेगाव, कुर्ला, धारावी, शीव-कोळीवाडा, मुंबादेवी येथेही एक ते तीन टक्क्यांपर्यंत मतदान घसरले.