निवडणुकीच्या आखाडय़ात नेत्यांच्या नातलगांचीही कसोटी

विधानसभा निवडणुकीचे रण पेटू लागले असून आखाडय़ात उतरविलेल्या आप्तस्वकीयांच्या विजयासाठी राजकारण्यांची धावपळ सुरू झाली आहे. निवडणुकीच्या आखाडय़ात उतरविण्यात आलेले नेते मंडळींचे आप्तस्वकीय सध्या मुंबईकरांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या राजकीय वारसदारांमध्ये मुलगा, मुलगी, जावई, भाऊ, पत्नी आदींचा समावेश असून शिवसेनाप्रमुखांचे नातू, विधान परिषदेच्या सभापतींचे जावई, मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हाती असलेल्या स्थायी समिती अध्यक्षांच्या पत्नी, खासदारांचे बंधू यांच्यासह माजी मंत्री-राज्यमंत्री, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या आप्तस्वकीयांचा समावेश आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे या यादीत आघाडीवर आहेत. काही वर्षांपूर्वी युवा सेनेच्या निमित्ताने राजकीय पटलावर उदयास आलेल्या आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि वरळीतून ते आखाडय़ात उतरले. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात या मतदारसंघातून तब्बल ११ जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वरळीच्या विजयाच्या स्वारीवर सध्या शिवसेनेतील पदाधिकारी, नेते मंडळी आणि शिवसैनिकांची मोठी फौज तैनात आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आणि तो काबीज केला. त्यामुळे शिवसेनेने अहिर यांना आपल्या पक्षात घेऊन वरळीचा किल्ला ‘युवराजा’साठी सुरक्षित केला आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना भाजपने उमेदवारी देऊन कुलाबा मतदारसंघातून रिंगणात उतरविले आहे. कुलाब्यातील तीनपैकी दोन नगरसेवक नार्वेकर कुटुंबातील आहेत. नार्वेकर यांचे वडिल हे पूर्वी नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा प्रवास करुन नार्वेकर भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना दुसऱ्यांदा शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यात यश आले आहे.

राज्यातील युतीच्या पहिल्या सरकारमध्ये शिक्षण खात्याचे मंत्रीपद भूषविणारे भाजपचे नेते दत्ता राणे यांचे पुत्र सुनील राणे यांना पक्षाने बोरिवलीतून उमेदवारी दिली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना डावलून पक्षाने सुनील राणे यांना उमेदवारी दिली आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या राजवटीत महिला आणि बाल कल्याण मंत्रीपद भूषविलेल्या वर्षां गायकवाड धारावीमधून नशीब आजमावत आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सलीम झकेरिया यांचे पुत्र आसिफ झकेरिया वांद्रे पश्चिम मतदारसंघात नशीब आजमावित आहेत. आसिफ झकेरिया राजकारणात नवे नाहीत. काँग्रेसचे अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ओळख आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये राज्यमंत्री पद भूषविलेले बाबा सिद्धीकी यांचे पुत्र झिशान सिद्धीकी यांना पक्षाने वांद्रे-पूर्व मतदारसंघाच्या आखाडय़ात उतरविण्यात आले आहे. भाजपचे पदाधिकारी जयप्रकाश ठाकूर यांच्या पत्नी आणि अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री विद्या ठाकूर गोरेगावमधून निवडणूक लढवित आहेत. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना शिवसेनेने भायखळा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.