मुंबई / यवतमाळ :  राज्यात सत्ता स्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी कायम ठेवली. पण त्याच वेळी सत्ताधारी महाविकास आघाडीतील मते फोडण्यासाठीच भाजपने उमेदवार उभा करून रंगत आणली आहे. यवतमाळमध्ये शिवसेनेतच बंडखोरी झाली असून, बंडखोराने माघार घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने चुरस वाढली आहे.

विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि शिवसेनेचे तानाजी सावंत यांची विधानसभेवर निवड झाल्याने पोटनिवडणुका होत आहेत. मुंडे यांच्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी राष्ट्रवादीने बीडचे संजय दौंड यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या वतीने कोकणातील राजन तेली यांनी अर्ज दाखल केला. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांना उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्रीकांत मुनगिनवार यांनी बंडखोरी केली आहे.बंडखोरीमुळे चुरस वाढली आहे.भाजपचे सुमीत बजोरिया यांना उमेदवारी दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत संख्याबळाच्या आधारे विजयाची संधी नसली तरी महाविकास आघाडीतील नाराजांची किमान १०-१५ मते फोडण्याचा प्रयत्न करण्याची योजना भाजपने आखली आहे.  महाविकास आघाडीने राष्ट्रवादीचे संजय दौंड यांना मुंडे यांच्या जागेवर उमेदवारी दिली. भाजपचे १०५ व काही अपक्ष असे सुमारे ११२ ते ११४ आमदार त्यांच्याकडे आहेत. तर महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठरावावेळी १६९ मते घेऊन आपली ताकद दाखवली होती.

संख्याबळाच्या आधारे भाजपला ही निवडणूक जिंकण्याची संधी नाही हे स्पष्ट आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांनीही नाराज आमदारांना गळाला लावण्याची जबाबदारी घेतल्याचे समजते. राजकीय समीकरणे कधीही बदलू शकतात. राजन तेली यांचे विविध पक्षांत मित्रत्वाचे संबंध आहेत. त्याचा काही उपयोग निश्चितपणे होईल.

 -प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद