अपंग आणि ज्येष्ठांचा उत्साह दांडगा

शहर आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच अपंग आणि ज्येष्ठ मतदारांचा उत्साह मोठय़ा प्रमाणात दिसून आला. शंभर वर्षांच्या वृद्धाने मोठय़ा उत्साहात मतदानास हजेरी तर लावलीच, पण असाध्य आजाराने ग्रासलेल्या मतदारांच्या उत्साहापुढे विकारदेखील ठेंगणा झाला.

मणक्यांचा विकार जडल्याने आधाराशिवाय एकही पाऊल टाकता न येणारे गुलाबराव मारुती भोसले (८६) रमाबाईनगर या भांडुपच्या डोंगराळ, दुर्गम भागातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्कर्षनगरातील यशवंत चांदजी शाळेतील मतदान केंद्रावर आले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी विमल (७१), चिरंजीव आणि नातवंडे असा लवाजमा होता. गुलाबराव हे निवृत्त शिक्षक आहेत. या अवस्थेत इतके श्रम का? अशी त्यांना विचारणा केली तेव्हा ते उसळले. ‘मतदान हा अधिकार आहे, हक्क आहे, हा भाग वेगळा पण प्रत्येकाने असा विचार केला तर निवडणुकीला काय अर्थ राहील, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. मी स्वत: हा हक्क बजावतो आणि घरातल्या प्रत्येकाला मतदानाचे महत्त्व पटवून देतो, असे त्यांनी सांगितले.

शंकर देवजी मासावकर (६८) यांनी रेल्वे अपघतात दोन्ही पाय गमावले, मात्र मतदानासाठी ते नेरळहून अंधेरी येथे आले. त्यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबानेदेखील मतदान केले. यारी रोड तेरे गल्ली येथील २१ वर्षीय संस्कार सुनील बोले हे सेरेब्रल पाल्सी या असाध्य रोगाने आजारी असूनदेखील चाकाच्या खुर्चीवरून मतदानास आले.

वर्सोवा येथील सेन्ट अ‍ॅन्टोनी शाळेत वृद्धत्वाने वाकलेली महिला मतदानास आली. पण मतदान करून परत जाताना त्यांना वाहनच उपलब्ध होत नव्हते, त्यामुळे तेथील विभागीय अधिकारी सुभाष गावडे यांनी त्यांना स्वत:च्या गाडीने घरी सोडले.

माहीममध्ये राहणारे ७१ वर्षीय गिरीश पाटील हे अपंग आहेत. अर्धागवायूच्या विकारामुळे गेल्या २५ वर्षांपासून ते व्हीलचेअरवरच आहेत. दादर येथील बालमोहन विद्यामंदिरमध्ये पाटील मतदानासाठी आले होते. मतदान करतानाच त्यांच्याकडून जनजागृतीही केली जाते. त्यांच्या व्हीलचेअरवर मतदान जनजागृती करणारे फलकही लावलेले होते. पाटील हे भाजी विक्रेता असून व्हीलचेअरवर असले तरी न चुकता मतदान आणि जनजागृतीचे काम सुरू असते.

संगणक अभियंता असलेले नीलेश सिंगित (३५) हे अपंग असून अपंगांसाठी मतदान सोयीचे कसे होईल याबद्दल त्यांचे प्रयत्न सुरू असतात. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या सल्ल्याने अनेक सुधारणा झाल्या आहेत. अपंगांसाठी ते वेगवेगळे प्रशिक्षणदेखील देतात. ते स्वत: व्हीलचेअरवरून मतदानास आलेच, पण त्यांचे १०० वर्षांचे आजोबादेखील त्यांच्यासोबत होते. त्यांचे वीस जणांच्या कुटुंबाने त्याच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला.

सकाळच्या सत्रात अनेक मतदार केंद्रांवर ज्येष्ठांचीच गर्दी तुलनेने अधिक होती. ज्येष्ठ आणि अपंगांना मतदान केंद्रावर असणारे स्वयंसेवक चाकाच्या खुच्र्यावरून मतदान कक्षापर्यंत जाण्यास मदत करत होते.

शंभर वर्षांचा उत्साही तरुण

दोन महिन्यांपूर्वी वयाची शंभरी ओलांडलेले खिल्लारीराम शर्मा दुपारी तीनच्या सुमारास मतदानासाठी भांडुपच्या पवार आंतरराष्ट्रीय शाळेतील मतदान केंद्रावर मतदानासाठी धडकले. निवडणुका जवळ आल्या की ते स्वत:हून त्यांच्या राहत्या इमारतीबरोबरच परिसरात मतदानाच्या हक्काची जाणीव करून देतात. नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा मतदानाचा अधिकार वापरून या निवडप्रक्रियेत सहभागी व्हा, असा संदेश ते देतात.

वाहतूक पोलिसांची कारवाई

मुंबईतील काही मतदान केंद्राबाहेर मतदारांकडून उभी केली जाणारी वाहने वाहतूक पोलिसांकडून टोकन करून अन्यत्र घेऊन जात असल्याचा प्रकार सोमवारी दिसून आला. याची कोणतीही कल्पना नसलेल्या मतदारांची मात्र वाहन ताब्यात घेण्यासाठी तारांबळ उडत होती. बोरीवलीतील कोरा केंद्र येथील मतदान केंद्राबाहेरही अशीच परिस्थिती होती. त्यामुळे मतदारांना त्याचा मनस्ताप होत होता. यासंदर्भात पश्चिम उपनगरचे (वाहतूक)पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी मतदान केंद्राबाहेर झीरो पार्किंग मोहीम हाती घेतल्याचे सांगितले.

वर्सोव्यात मंडपही सुसज्ज

वर्सोवामध्ये सात बंगला परिसरात वर्सोवा वेल्फेअर शाळेच्या पटांगणात मंडप उभारून मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. अत्यंत उच्चभ्रू विभाग असलेल्या केंद्रात अनेक बॉलीवूडचे कलाकारही मतदानासाठी येतात. त्यामुळे येथे मंडपातील पटांगणातही बऱ्यापैकी सोयीसुविधा देण्यात आल्या होत्या. पटांगणातील चिखलावर रेती टाकण्यात आली होती. तर केंद्राबाहेर फळ्या टाकून चालण्यासाठी पायवाटा तयार करण्यात आल्या होत्या. तर चिखलावरही ताडपत्री टाकून चालण्यायोग्य बनवण्यात आले होते.

गैरसोय

दिंडोशीमधील संतोषनगरच्या एका शाळेमध्ये पहिल्या मजल्यावर मतदान केंद्र होते. येथे जाण्यासाठी लिफ्टही उपलब्ध होती. परंतु याची माहिती देण्यासाठी कोणीही उपलब्ध नसल्याने जेष्ठ नागरिकांना पायऱ्या चढत जाऊनच मतदान करावे लागत होते. अनेक मतदान केंद्रे मैदानात असल्याने पावसाने झालेल्या चिखलामुळे मतदारांची मोठी गैरसोय होत होती. अपंगांसाठी व्हीलचेअर उपलब्ध होत्या, परंतु मैदानात चिखल असल्याने त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेणे नातेवाईकांना अडचणीचे होत होते. अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था मात्र कोठेही नव्हती.