करोनाने जगायचे कसे हे शिकविले असून प्रत्येकाने स्वत: व कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. करोना नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृती गट स्थापन करण्याबरोबरच प्रत्येक गावात करोना दक्षता समित्या स्थापन करण्याचा मानस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसरात उभारण्यात आलेल्या उस्मानाबाद कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्यातील जनतेला आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून या माध्यमातून महाराष्ट्र हे जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे राज्य घडविण्याचे स्वप्न असून ते मी घडविणारच असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

करोनावर मात करण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.