विक्रोळीतील गर्भपात सेंटर; एफडीएच्या कारवाईत आणखी साठा जप्त

बेकायदेशीररीत्या गर्भपात किट वापरून रुग्णांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या एका महिला आयुर्वेदिक डॉक्टरविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याआधी १५ दिवसांपूर्वी महापालिकेने या सेंटरविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. बॉम्बे नर्सिग होम कायद्यानुसार संबंधितांना एक महिन्याची मुदत दिल्यानंतरच कारवाई करता येते. त्यानुसार पालिकेने कारवाई सुरू केली होती, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना मिळालेल्या माहितीनुसार, या सेंटरवर कारवाई करण्यात येऊन विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत या सेंटरच्या तळमजल्यावर असलेल्या वेदांत मेडिकल स्टोअरमधून नोंद नसलेल्या औषधांचा साठाही हस्तगत करण्यात आला आहे. या सेंटरमध्ये सापडलेल्या गर्भपात किटस् या दुकानातून विकल्या गेलेल्या नसल्या तरी या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सहायक आयुक्त माधुरी पवार यांनी सांगितले.

पालिकेला अधिकार नाही

बेकायदेशीररीत्या मेडिकली टर्मिनेटेड प्रेगन्सी (एमटीपी) किट वापरले जात असल्यामुळे गुप्तचर विभागाच्या सहायक आयुक्त माधुरी पवार यांच्या नेतृत्वाखाली अन्न निरीक्षकांनी कारवाई केली होती. या प्रकरणी पालिकेकडूनही या नर्सिग होमविरुद्ध कारवाई प्रस्तावित होती, अशी माहितीही एफडीएतील सूत्रांनी दिली. नर्सिग होमवर छापा टाकण्याचे अधिकार पालिकेला नाहीत. फक्त तेथे बेकायदेशीर बाबी होत असल्याच्या तक्रारी आल्यास त्याविरुद्ध नोटीस बजावल्यानंतरच कारवाई करता येते, असे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.