विक्रम गायकवाड, अभिनेता

वाचनाची गोडी मला लहानपणापासूनच होती. शाळेत अभ्यासाची क्रमिक पुस्तके वाचायचा कंटाळा करायचो, पण गोष्टींची पुस्तके/मासिके आवडीने वाचायचो. त्यातही ‘चांदोबा’, ‘ठकठक’ ही लहान मुलांची मासिके विशेष वाचली. खरे वाचन म्हणाल तर ते महाविद्यालयात गेल्यानंतर म्हणजे इयत्ता अकरावी पासून सुरू झाले. पुढे अभिनय व कलाक्षेत्रातच काम करायचे ठरविले आणि मुंबईला आलो तेव्हा हे वाचन अधिक समृद्ध होत गेले. मुंबईत आम्ही काही जण एकत्र भाडय़ाच्या घरात राहत होतो. घरात दूरचित्रवाणी संच नव्हता आणि त्या वेळी फारसे कामही नव्हते. त्यामुळे त्या काळात विविध विषयांवरच्या पुस्तकांचे वाचन मोठय़ा प्रमाणात झाले. अन्य कोणत्या गोष्टीत वेळ घालविण्यापेक्षा मी त्या वेळी झपाटल्यासारखी पुस्तके वाचून काढली. विश्वास पाटील, भालचंद्र नेमाडे यांची पुस्तके, विजया मेहता यांचे ‘झिम्मा’ आणि अन्य अनेक पुस्तके वाचली.

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

‘उंच माझा झोका’ ही मालिका मला मिळाली आणि त्या वेळी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे वाचन झाले. ‘न्या. महादेव गोविंद रानडे’ साकारण्यापूर्वी त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांचे, चरित्रांचे वाचन केले. न्या. रानडे आपल्या बोलण्यातून नेहमी संत तुकाराम यांच्या अभंगातील काही वाक्ये/अभंग सांगत असत. त्यामुळे चित्रीकरणाच्या वेळी तुकारामांची गाथा वाचून काढली. अभ्यासली. त्यातील काही अभंग पाठही केले. आजही नाटकाचा प्रयोग किंवा मालिका-चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी वेळ मिळेल तेव्हा माझ्याकडे असलेले एखादे पुस्तक वाचत बसतो. वाचनाला विषयांचे किंवा लेखकांचे कोणतेही बंधन नाही. विविध विषयांवरील आणि विविध लेखकांची पुस्तके वाचतो. सध्या ‘नेपोलियन’वरील चरित्राचे वाचन सुरू आहे. डॉ. एस. एल. भैरप्पा यांचीही ‘पर्व’, ‘वंशवृक्ष’ आणि त्यांच्या अन्य कादंबऱ्याही वाचून झाल्या आहेत.

कोणत्याही क्षेत्रात सुरुवातीला धडपड आणि संघर्ष करावाच लागतो. तसा तो माझाही होता. त्या काळात आय. एन. रॅण्ड यांनी लिहिलेले ‘द फाऊंटन हेड’ हे पुस्तक वाचले. एका वास्तुविशारदाच्या आयुष्यावर हे पुस्तक असून त्याचा संघर्षांचा काळ, त्या संघर्षांवर त्याने केलेली मात, त्याची जिद्द पुस्तकात आहे. माझ्या संघर्षांच्या काळात या पुस्तकाने मला धैर्य आणि आत्मविश्वास दिला. पुढे हे पुस्तक ऑडिओ स्वरूपात निघाल्यानंतर ते भ्रमणध्वनीमध्ये डाऊनलोड करून घेतले. आता ते केव्हाही ऐकता येते.

लहानपणापासून पुस्तकांच्या वाचनाची आवड असल्याने विविध प्रकारची आणि विविध लेखकांची पुस्तके वाचली. पुस्तके आणि वाचन यामुळे माझी भाषा शुद्ध झाली तसेच  विचार प्रगल्भ झाले. माझ्यासाठी वाचनाचा हा फायदा झाला.

वाचनाची आवड कमी होत चालली असल्याची ओरड ऐकू येते. पण मला तरी तसे वाटत नाही. निदान मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे तरी अशी परिस्थिती नाही. अन्य क्षेत्रातील तरुण पिढीही वाचन करते. हल्लीच्या तरुण पिढीचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असल्याने त्यांचे वाचन अधिक प्रमाणात इंग्रजी पुस्तकांचे व त्यांच्या क्षेत्राशी संबंधित विषयांचे असते. आता वाचनाची पद्धतही बदलली आहे. ‘किंडल’, ‘ई बुक रीडर’, स्मार्ट भ्रमणध्वनी अशा विविध माध्यमातूनही पुस्तकांचे वाचन केले जाते. तसेच आजच्या पिढीला अन्य पर्याय उपलब्ध आहेत. काही पुस्तकांवर विशेषत: इंग्रजी पुस्तकांवर चित्रपट, ‘ऑडिओ बुक’ निघाली आहेत. त्यामुळे वेगळ्या प्रकारे आणि माध्यमातून हल्लीची पिढी वाचते आहे.

माझ्या लहानपणी फक्त ‘दूरदर्शन’ होते. मनोरंजनाची साधनेही मर्यादित होती. त्यामुळे तेव्हा ‘वाचन’हा मनोरंजनाचा/करमणुकीचा एक पर्याय होता. आत्ताच्या पिढीनेही दूरचित्रवाणी व अन्य मनोरंजनाच्या साधनांचा जरा कमी वापर केला तर त्यांनाही वाचनाची गोडी नक्की लागेल आणि एकदा वाचनाची गोडी लागली ती सुटता सुटणार नाही हे नक्की. आमच्या घरी छोटेसे का होईना ‘बुकशेल्फ’ आहे. विविध विषयांवरील पुस्तके विकत घेऊन त्यांचा संग्रह केला आहे. अलीकडेच माझ्या वाढदिवशी माझ्या बायकोने मला वेगवेगळ्या विषयांवरील तीस पुस्तके भेट दिली. वाढदिवस किंवा अन्य काही निमित्ताने मला पुष्पगुच्छ न देता पुस्तक भेट द्या, असे मित्र, नातेवाईक यांना सांगतो.

मला स्वत:ला आजही पुस्तक हातात घेऊन वाचायला आवडते. नव्या पुस्तकांना जो एक वेगळा सुगंध येतो तो ‘किंडल’ व ‘ई-बुक रीडर’ला नाही. चमच्याने खाणे/जेवणे आणि हाताने जेवणे यात जे समाधान किंवा आनंद आहे तो मला पुस्तके हातात घेऊन, त्याची पाने उलटून वाचताना मिळतो. नव्या पुस्तकाचा, त्याच्या पानांचा वास एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो.