News Flash

“पाकिस्तानला निघून जा”, मुस्लीम रिक्षाचालाकाला त्रास देणारी अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात

तक्रार झाल्यानंतर दोन तासात मुलांचा शोध घेत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं

“पाकिस्तानला निघून जा”, मुस्लीम रिक्षाचालाकाला त्रास देणारी अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात

मुस्लीम रिक्षाचालकाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अझरुद्दीन जमीरुल हक कुरेशी उर्फ बबलू यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कुरेशी यांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही मुलांनी सोमवारी रात्री वांद्रे ते भांडूप आपला पाठलाग करत असभ्य वर्तन केलं. यावेळी त्यांनी धार्मिक भावना दुखावतील अशी टिप्पणीही केली.

कुरेशी हे वांद्रे येथील बेहरामपाडामधील रहिवासी आहेत. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड सोडल्यानंतर दुचाकीवर असणाऱ्या तीन तरुणांना सतत आपला पाठलाग केला. विक्रोळीमधील कन्नमवार नगर येईपर्यंत ते वारंवार असभ्य वर्तन करत त्रास देत होते अशी माहिती कुरेशी यांनी दिली आहे.

“माझ्याशी असभ्य वर्तन करण्याबरोबरच तसंच धार्मिक भावना दुखावण्यासोबत ते माझा मुल्ला असा उल्लेख करत होते. पाकिस्तानात निघून जा असंही ते ओरडून सांगत होते. काश्मीर आता भारताचा भाग असल्याचंही ते बोलत होते”, अशी माहिती कुरेशी यांनी दिली आहे.

“जवळपास तीन किमीपर्यंत हा प्रकार सुरु होता. अखेर कांजुरमार्गला मी माझी रिक्षा थांबवली आणि त्या मुलांना तुम्हाला असं करुन काय मिळणार आहे अशी विचारणा केली. पण त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला निघून जा अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी माझी दाढी खेचत शारिरीक हिंसा करण्याचा प्रयत्न केला”, असं कुरेशी यांनी सांगितलं आहे.

हा प्रकार पाहून तिथे गर्दी जमा झाली. यावेळी काही लोकांनी मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या मुलांनी तेथून पळ काढला. गर्दीतील काही लोकांनी सल्ला दिल्यानंतर कुरेशी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीची नोंद घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तिन्ही मुलांचे फोटो मोबाइलमध्ये कैद झाल्याने पोलिसांनी तक्रार झाल्यानंतर दोन तासात मुलांचा शोध घेत ताब्यात घेतलं. “मुलांना ताब्यात घेतलं असता ती अल्पवयीन असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे गुन्हा गंभीर असला तरी आम्ही त्यांना अटक करु शकत नाही. याप्रकऱणी आम्ही अधिक तपास करत आहोत”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

कुरेशी आपला चुलत भाऊ इम्तियाज शेखसोबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. पोलिसांनी दाखवलेलं तात्पर्य आणि केलेल्या तात्काळ मदतीचं कुरेशी यांनी कौतुक केलं असून आभार मानले आहेत. “मुलं अल्पवयीन असली तरी त्यांच्याविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. या मुलांच्या मनात आत्तापासूनच नकारात्मक गोष्टी भरल्या जात आहेत”, असं शेख यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 8:18 pm

Web Title: vikroli police booked three minors for hurling communal abuses to muslim rickshaw driver sgy 87
Next Stories
1 धक्कादायक! मुंबईत हॉटेल रुममध्ये ड्रायव्हरने विवाहितेवर केला बलात्कार
2 मुंबई : गटाराची झाकणं चोरणाऱ्या दोघांना अटक
3 संकटसमयी कुटुंबीयच पाठिशी! दमानियांच्या राज ठाकरेंवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर
Just Now!
X