दुचाकीस्वाराच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेले पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्यापाठोपाठ त्यांच्या आईचेही निधन झाले आहे. विलास शिंदे यांच्या तेराव्याचा विधी सुरु असताना त्यांच्या आईला ह्रदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांचा मृत्यू झाला. शिंदे यांच्या पाठोपाठ त्यांच्या आईचेही निधन झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सोमवारी साता-यात विलास शिंदे यांच्या मूळगावी तेराव्याच्या विधी सुरु होत्या. विधी संपत असतानाच विलास शिंदे यांच्या आई कलावती विठोबा शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयातही नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ऑगस्टमध्ये खारमधील सिग्नलजवळ कर्तव्य बजावत असताना पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्यावर हल्ला झाला होता. विनाहेल्मेट दुचाकी चालवणा-या एका अल्पवयीन मुलाला शिंदे यांनी अडवले होते. या मुलाने त्याचा भाऊ अहमद कुरेशीला बोलावून घेतले होते. कुरेशीने तिथे पोहोचल्यावर शिंदे यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यांच्या डोक्यात बांबूने प्रहार करुन पळ काढला.  यात गंभीर दुखापत झाल्याने शिंदे हे कोमामध्ये गेले होते. तब्बल नऊ दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. पण ३१ ऑगस्टरोजी लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान शिंदे यांची प्राणज्योत मालवली होती.

शिंदे यांच्या पार्थिवावर साता-यातील शिरगाव या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. घरातला कर्ता पुरुष गमावल्यानंतर आणखी एकाचे निधन झाल्याने शिंदे कुटुंबावर सध्या शोककळा पसरली आहे.