विवाह नोंदणी करणाऱ्या संकेतस्थळांवर तो स्वत:चे बनावट प्रोफाइल बनवायचा. अमेरिकेत उच्चशिक्षण, जपानी कंपनीत २२ लाख पगार असल्याचे भासवायचा. अनेक उच्चशिक्षित मुली त्याला भुलायच्या आणि त्याच्या जाळ्यात अडकवायचा. या मुलींशी शरीरसंबंध प्रस्थापित करायचे आणि त्यांचे पैसे घेऊन पळ काढायचा अशी या ठकसेनाची गुन्ह्य़ाची पद्धत होती. अनेक मुली त्याला फसल्या होत्या. विलेपार्ले पोलिसांनी एका झेंडय़ावरून त्याला गजाआड केले.
शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलच्या आवारात एक आलिशान गाडी आली. वैशालीचा भावी नवरा राहुल पाटील खाली उतरला. लग्न ठरल्याने राहुल देवदर्शनासाठी वैशालीला शिर्डीत घेऊन आला होता. रात्र झाल्याने हॉटेलात राहुलने एक रूम बुक केली होती. आता आपण लग्नच करणार आहोत म्हणून राहुलसोबत रूमवर जायला वैशालीला वावगे वाटले नाही. दुसऱ्या दिवशी तिच्या आई-वडिलांना भेटायला राहुल पुण्यात जाणार होता. आता तू माझी पत्नी झालीस आहे, असे सांगत राहुलने तिला आपल्या बाहुपाशात घेतले.
वैशालीने एमबीबीएसची डिग्री पूर्ण केली होती. मुंबईत शिकायला राहत होती. लग्न जुळविण्यासाठी तिने एका प्रसिद्ध मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर आपले नाव नोंदवले होते. राहुलने तिला प्रतिसाद दिला. राहुल पाटील हा तरुण जपानच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होता. महिन्याला त्याला २२ लाख रुपये पगार होता. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले होते. महाबळेश्वरला त्याचे फार्म हाऊस आणि १५० एकर जागा होती. वैशालीने प्रतिसाद देताच राहुलने तिला संपर्क केला आणि तिला भेटायला आला. राहुलच्या अस्खलित इंग्रजी बोलण्याने वैशाली प्रभावित झाली. राहुलने पहिल्या भेटीत तिच्यावर प्रभाव पाडला. त्याच्याकडे महागडी गाडी होती. त्याने जपानच्या कंपनीचे व्हिजिटिंग कार्डही वैशालीला दिले. पहिल्या भेटीत राहुलने वैशालीला होकार दिला होता. आपण लगेच लग्न करू, मला परत जपानला जायचे, असे त्याने सांगितले. एवढे चागंले स्थळ मिळाल्यावर वैशाली आनंदात होती. दुसऱ्या दिवशी तो तिच्या आई-बाबांना भेटायला जपानला जाणार होता. शिर्डीच्या त्या हॉटेलातील मधुचंद्र उरकल्यानंतर सकाळी राहुलने वैशालीचे क्रेडिट कार्ड मागितले. माझे कार्ड चालत नाही. पैशांची गरज आहे, असे सांगून त्याने मागून घेतले होते. राहुल नवराच होणार होता त्यामुळे वैशालीने कार्ड दिले. मात्र एकाच दिवसात त्याने लाखो रुपये काढले होते.
दुसऱ्या दिवशी पुण्याला जाण्यासाठी वैशालीने राहुलला फोन केला आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. राहुलने छद्मी हास्य करत सांगितले, कोण तू.. अशा किती पोरी आल्या आणि माझी रात्र सजवून गेल्या. तुझे क्रेडिट कार्डही विसर. फोन कट झाला. त्यानंतर त्यांचा मोबाइल लागलाच नाही. वैशाली एका ठकसेनाला बळी पडली होती. तिची केवळ आर्थिकच नव्हे, तर शारीरिक फसवणूक झाली होती. अवघ्या २४ तासांपूर्वी मॅट्रिमोनिअल साइटवर एक तरुण भेटतो काय आणि त्याच्या भूलथापांना आपण बळी पडतो काय.. वैशालीला स्वत:चीच घृणा वाटू लागली होती.
पण या ठकसेनाला धडा शिकवायचा या जिद्दीने वैशालीने विलेपार्ले पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रक्षा महाराव, पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर हे वैशालीचा किस्सा ऐकून अवाक् झाले. या ठकसेनाने अनेक मुलींना या विवाह नोंदणी संकेतस्थळावरून गंडा घातला असावा, असा तर्क पोलिसांना लावला. त्याला पकडण्याचे आवाहन पोलिसांपुढे होते. ज्या मोबाइल क्रमांकावरून राहुल बोलत होता, तो मोबाइल क्रमांक एका तरुणीचा होता. ती उच्चशिक्षित तरुणी अशाच प्रकारे राहुलच्या जाळ्यात अडकली होती. त्याने या तरुणीला असेच फसवून १२ लाख रुपयांना गंडवले होते, शिवाय तिचा मोबाइलही नेला होता. याच मोबाइलवरून त्याने वैशाली नावाच्या आणखी एका सावजाला जाळ्यात पकडले होते. राहुलला लगेच पकडणे गरजेचे होते. अन्य मुलींनाही तो जाळ्यात अडकवणार होता. पोलिसांनी शिर्डी गाठली. शिर्डीच्या त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पोलिसांना गाडी दिसली, परंतु गाडीचा अर्धवट क्रमांक दिसत होता. अर्धवट क्रमांकावरून गाडी ओळखायची कशी, असा प्रश्न उभा राहिला. गाडी महागडी शिवाय नवीन दिसत होती. ज्या आधार कार्डाच्या आधारे राहुलने हॉटेलातील खोली बुक केली होती ते आधार कार्ड असलेली व्यक्ती तुरुंगात होती. त्यामुळे हा खूप चलाख ठकसेन असल्याची पोलिसांना खात्री पटली.
गाडीचे निरीक्षण करताना पोलिसांना एक झेंडा दिसला. तो एका राजकीय पक्षाचा होता. पोलिसांना हा दुवा पुरेसा होता. पक्षाचा झेंडा आणि नवीन गाडी या दुव्यावरून पोलिसांनी शोध सुरू केला आणि माळशेज घाटाजवळील एका ढाब्यावर पोहोचले. ‘ही माझीच गाडी आहे,’ असे ढाबा मालकाने सांगितले. ढाब्यावाल्याने माहिती दिली की त्याच्या मित्राच्या बहिणीचे एका मुलाशी लग्न ठरले आहे. त्या मुलाचे नाव राहुल पाटील आहे. त्याला मी ही गाडी दिली आहे, कारण तो काही दिवस भारतात आहे. पोलिसांचे पुढचे काम सोप्पे झाले. या ढाबाचालकाच्या मित्राच्या बहिणीलाही ठकसेन राहुल पाटीलने फसवले होते. पोलिसांकडे आता वेळ नव्हता. राहुल पाटील आणखी एका मुलीला फसविण्याच्या तयारीत होता. ढाब्यावाल्याकडून पोलिसांना राहुलचा दुसरा मोबाइल क्रमांक मिळाला.
पोलिसांनी पनवेलजवळील कर्नाळ्याच्या रिसॉर्टमध्ये सापळा लावला. राहुल एका तरुणीला घेऊन एका रूममध्ये शिरला. त्याच्या पाठोपाठ पोलिसांनी रूम सव्‍‌र्हिस अशी हाक मारत दार ठोठावले. राहुलने दरवाजा उघडताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यासोबत रुममध्ये आलेली तरुणी भांबावली. पोलिसांना अर्धा तास जरी उशीर झाला असता तर तीसुद्धा बळी पडली असती. ही तरुणी बीई मेकॅनिकल होती. आदल्या दिवशी तिने राहुलला आपल्या घरी नेऊन आई-बाबांची भेटही घालून दिली होती.
राहुलच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्याचे खरे नाव मोरांजक भावसार (३२) होते. त्याचे शिक्षण फक्त दहावी झालेले होते. अस्खलित इंग्रजी हे त्याचे कौशल्य होते. अनेक विवाह नोंदणी संकेतस्थळावर तो राहुल पाटील नावाने नाव नोंदवायचा. अमेरिकेतील केम्ब्रिजमध्ये शिक्षण, जपानच्या कंपनीत २२ लाख पगार, महाबळेश्वरला मालमत्ता अशी ओळख तो सांगायचा. तो मूळच्या ठाण्याचा. कुटुंबीयांनी त्याला घरातून हाकलून दिले होते. त्यानंतर त्याने पैसे कमविण्यासाठी हा मार्ग पत्करला. त्याला भुलून मुली प्रतिसाद द्यायच्या. मग या मुलींना भेटायला बोलावून राहुल त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवायचा, शिवाय त्यांच्याकडील पैसे घेऊन पोबारा करायचा. आतापर्यंत त्याने किमान ६०हून अधिक मुलींना फसवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. त्या सगळ्यांशी त्याने शरीरसंबंध ठेवले होते. बदनामीपोटी तरुणी तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर यांनी सांगितले. विलेपार्ले पोलीस ठाण्यात १२ मुलींनी तक्रारी दिल्या आहेत. याच्यापूर्वी तो अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका अशाच फसवणुकीच्या गुन्ह्य़ात तीन वर्षे तुरुंगवास भोगून आला होता.
या वेळी मात्र त्याच्या गाडीवरील झेंडय़ाने तो पकडला गेला. पोलीस निरीक्षक निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, तसेत संतोष शिंदे, अनिल भोसले, अंकुश मोहिते आदी पोलिसांनी या ठकसेनाला गजाआड करण्यात मोलाची भूमिका बजावली. या वेळी पोलिसांनी त्याच्यावर बलात्कार, फसवणूक आदी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.