मुंबईतील विलेपार्ले येथील सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी नाझीर खान याची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टाने रद्द केली. हायकोर्टाने मुंबई पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढत आरोपीला १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. या खटल्याचा तपास करणारा तपास अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांची चौकशी करुन कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्यांकडून ही रक्कम वसूल करावी, असेही हायकोर्टाने निकालात म्हटले आहे.

जानेवारी २०१२ मध्ये विलेपार्ले येथे राहणारी सात वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. २ जानेवारी रोजी पश्चिम द्रुतगती मार्गावरील झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मुलीची बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपी नाझीर खान याला अटक केली होती. नाझीरला जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. हे प्रकरण मुंबई हायकोर्टात पोहोचले. हायकोर्टात आरोपी नाझीरच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान सांगितले की, मुलीच्या अंगावर मोठे प्लायवूड पडल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूसाठी आपण जबाबदार ठरु नये म्हणून भीतीपोटी नाझीरने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती, ही बाब त्याने पोलिसांनाही तपासादरम्यान सांगितली होती. तर नझीरच्या विरोधात ठोस परिस्थितीजन्य पुरावे असल्याने सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा योग्य असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता.

या प्रकरणात मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली हे पोलिसांना सिद्ध करता आले नाही. ठोस पुरावेदेखील नाहीत, असे ताशेरे ओढत हायकोर्टाने पोलिसांना फटकारले. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर मुलीच्या मृत्यूमागचे सत्य शोधणे अशक्य असून पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणाच केला, असे खडेबोलही हायकोर्टाने सुनावले.

हायकोर्टाने आरोपी नाझीर खानची फाशीची शिक्षा रद्द केली. पण पुरावे नष्ट केल्याप्रकरणी त्याची सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली. मात्र, ही शिक्षा त्याने निकालापू्र्वीच भोगल्याने आरोपीची सुटका करण्यात आली.