गणेशोत्सव मंडळांना उपक्रम राबविण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेला ५ कोटी रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांना देण्याच्या निर्णयावर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी शनिवारी शिक्कामोर्तब केले. सरकार हा निधी गणेशमंडळांना देणार असतील तर त्यातून एखादे गाव दत्तक घेण्याचा विचारही या बैठकीत मांडण्यात आला. दरम्यान, याविषयी मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली असून त्यातून या निधीच्या विनियोगाविषयी अधिक स्पष्टता येईल.

सरकार हा निधी गणेशोत्सव मंडळांना कोणत्या निकषांवर देणार आहे? त्यात प्रदेशानुसार वाटा असेल की मंडळांच्या कामानुसार याविषयी काहीच स्पष्टता नसल्याचे उघड झाले. सरकारने तरतूद केलेला संपूर्ण निधी दुष्काळग्रस्तांकडे वळविण्याची सर्वच गणेशोत्सव मंडळांची इच्छा असून त्यासाठी गाव दत्तक घेण्यापासून सरकारी योजनेत पैसे देता येईल, असा विचारही पुढे आला. मंगळवारी मंत्रालयात याच निधीविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले  आहे.