काँग्रेस नेते, माजी मंत्री मुरली देवरा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी २० मार्चला पोटनिवडणूक होणार असून,  या जागेवर सत्ताधारी भाजपचा उमेदवार निवडून येणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे किंवा शायना एन. सी. यापैकी कोणाला तरी संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
विधानसभेत भाजप-शिवसेना युतीचे बहुमत असल्याने या पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.भाजपकडून पक्षाचे पदाधिकारी विनय सहस्रबुद्धे यांच्या नावाची चर्चा आहे. सध्या पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात सहस्रबुद्धे महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. गेली अनेक वर्षे पक्षात दुर्लक्षित राहिलेल्या सहस्रबुद्धे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. याशिवाय पक्षात पुढे पुढे करणाऱ्या शायना एन. सी. यांचाही या जागेवर डोळा आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी डावलण्यात आले होते. यंदा तरी संधी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
सुरेश प्रभू आणि प्रकाश जावडेकर या राज्यातील दोन नेत्यांना अन्य राज्यांतून राज्यसभेवर निवडून आणावे लागले. यामुळेच एखाद्या बाहेरच्या नेत्याचा नावाचा विचार होऊ शकतो, असाही भाजपमध्ये मतप्रवाह आहे.