कला वक्तृत्वाची : विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९०४ मध्ये स्थापन केलेल्या क्रांतिकारकांच्या ‘अभिनव भारत’ या संघटनेचे आपल्या हातानेच विसर्जन केले. १० मे १९५२ रोजी सलग तीन दिवस पुणे येथे ‘अभिनव भारत’चा सांगता समारंभ झाला. त्या व्याख्यानमालेतील सावरकर यांच्या भाषणातील काही भाग.

drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
thane police issued tadipaar notice to sharad pawar faction ncp ex corporator mahesh
ठाणे: शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकावर तडीपारीची टांगती तलवार
instead of Kripal Tumane Raju Parve got Candidacy from Ramtek
शिंदेसोबत जाण्याच्या निर्णयाने तुमानेंची अवस्था ‘तेलही गेले अन् …’
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

कोणताही देश पारतंत्र्याचे जोखड फेकून देऊन स्वतंत्र होतो. याचाच अर्थ असा असतो की, पारतंत्र्याच्या काळात परकीय शत्रूंनी त्याची जी विघटना केलेली असते, त्याच्यात दास्यप्रवण वृत्तीची जी जोपासना केलेली असते, बलात्कार, छळ, निष्पीडन करून त्याची जी दुर्दशा केलेली असते, दुष्काळ, दारिद्रय़ नि दैन्य यांचा जो तेथे हाहाकार माजविलेला असतो तो स्वातंत्र्यसंपादनाच्या पहिल्या दिवशी त्या देशास बहुतांशी तसाच ग्रासित राहिलेला असतो. स्वातंत्र्यानंतर जी स्वराज्यीय शासनसंस्था लगोलग कारभार पाहू लागते तिला ती कोणच्याही राजकीय पक्षाची असली तरी हा सर्व हाहाकार नि दुर्दशा एक दिवसात कोण्या जादूच्या कांडीसारखी नाहीशी करता येणे अशक्य असते. अशा वेळी सर्व नागरिकांचे मुख्य राष्ट्रीय कर्तव्य हेच असले पाहिजे की, काही काळ तरी कळ सोसून आपल्या स्वकीय शासनास ती दुर्दशा निवारण्यासाठी शक्य ते ते साहाय्य प्रत्येकी आपल्या परिश्रमाने नि सहशीलतेने देत राहिले पाहिजे.

नवनिर्मित स्वराज्याची घडी नीट बसविण्याचे कठीण कार्य बहुमताने काँग्रेस पक्षाच्या हाती सोपविले न जाता दुसऱ्या साम्यवादी, समाजवाद, हिंदुत्वनिष्ठ प्रभृती इतर कोणत्याही पक्षाचे हाती जाते तरी काँग्रेसप्रमाणेच, काही अननुभवामुळे, तर काही सत्तालोभामुळे त्या इतर पक्षांचे हातूनही अशा काही चुका घडल्याच नसत्या असे नाही. अशा परिस्थितीत तत्कालीन शासन संस्थेकडून काही राजकीय चुका घडल्या, काही व्यक्तिव्यक्तींचा पक्षीय द्वेषभावनेने छळ झाला, तरी आपण एकदम डोक्यात राख घालता कामा नये. माझ्यापुरते बोलावयाचे तर, ब्रिटिशांच्या वेळी माझा जो छळ झाला तो आपण जाणताच; परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मला जे कारावास भोगावे लागले त्यामुळे अधिक मनस्ताप सोसावा लागला; तथापि मी त्याविषयी शासनाविरुद्ध चकार शब्दही कधी काढला नाही.

नवप्रस्थापित भारतीय महा-राज्याच्या संरक्षणार्थ नि संवर्धनार्थ आता इतर सर्व गोष्टींच्या आधी, मध्ये नि नंतर आवश्यकता आहे प्रचंड शस्त्रबळाची. कारण आजही सारी मानवजात राष्ट्रवादाच्या नि शस्त्रवादाच्या राजकीय पातळीवर उभी आहे ही खूणगाठ बांधून ठेवा. जी राष्ट्रे स्वत:च्या शस्त्रबळाच्या आधारावर स्वतंत्र आहेत तीच काय ती आज खरीखुरी स्वतंत्र आहेत आणि इतर दुर्बळ राष्ट्रांवर आपापले वर्चस्व स्थापण्यासाठी खटपट करीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. अफिमी स्वप्नरंजनात न रंगता जर तुम्हास या वस्तुस्थितीत आणि या आक्रमक सशस्त्र राष्ट्रांच्या धकाधकीत जगायचे असेल, जर खरेखुरे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अजेयपणे जगायचे असेल तर भोंगळ्या नि दुबळ्या शांतिपाठांच्या मृगजळाच्या पाठीमागे धावत सुटण्याची तुमची हाडीमासी खिळलेली खोड सोडून देऊन आपल्या या स्वतंत्र हिंदुराष्ट्राचे रोखठोक शस्त्रबळ इतर आजच्या कोणत्याही राष्ट्राच्या शस्त्रबळाइतके तरी समर्थ बनविण्याचे कार्य तात्काळ हाती घ्या. कारण तुम्ही साऱ्या देशभर लाख कारखाने उभारलेत, शाळा काढल्यात नि संपत्तीचा धूर तुमच्या राष्ट्रात निघू लागला तरी जर त्या सर्वाचे तुमच्या शत्रुस्थानी असलेल्या प्रबळ राष्ट्रांच्या सशस्त्र आक्रमणापासून संरक्षण करणाऱ्या भूदलाचे, नौदलाचे नि विमानदलाचे सवाई शस्त्रबळ तुमच्यापाशी नसेल तर त्या तुमच्या साऱ्या औद्योगिक कारखान्यांची, अन्नधान्यांची, विद्यापीठांची नि संपत्तीची लुटालूट करून परकीय आक्रमक धूळधाण उडविल्यावाचून राहणार नाहीत. तशी शस्त्रबळावाचून असुरक्षित संपत्ती हीच लुटारू,  सशस्त्र परकीय दरोडेखोरांना एक प्रलोभन, एक आमंत्रण असते. ह्य़ा कडू सत्याचा अनुभव विशेषत: भारताने आजपर्यंत इतिहासात शंभर वेळा घेतलेला आहे; पण भारताचे डोळे अजूनही उघडत नाहीत.

भारतीय तरुणांनो, मघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता या स्वातंत्र्यसंरक्षणाचा भार विशेषत: तुम्हांवरच आहे. जर या आमच्या जुन्या पिढीच्या हाती असलेल्या आजच्या राज्य शासनाच्या नि नेतृत्वाच्या हातून हे वरील राष्ट्रीय स्वातंत्र्यरक्षणार्थ अत्यंत आणि सर्वप्रथम आवश्यक असलेले शस्त्रसज्जतेचे कार्य पार पडेनासे झाले तर अराजक न माजविता मतपेटीच्या मार्गे तुम्ही हे जुने नेभळट नेतृत्व झुगारून द्या. तुमचे स्वत:चे तरुण नेतृत्व उभारा आणि या भारतात पराक्रमी शासन स्थापून वरील शस्त्रसज्जतेचा कार्यक्रम धडाडीने नि धडाक्यात पार पाडा. ध्यानात धरा की, अनाव्हानीय आणि अजेय असे भारतीय शस्त्रबळ असले तरच हे भारतीय महाराज्यही स्वतंत्र नि अजेय राहू शकेल.

(मो. ग. तपस्वी संकलित व संपादित आणि अभिषेक टाइपसेटर्स अ‍ॅण्ड पब्लिशर्स प्रकाशित ‘बोल अमृताचे’ या पुस्तकावरून साभार)

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को-ऑ. बँक लिमिटेड’, ‘आयसीडी’ (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’

 

 संकलन –  शेखर जोशी