स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिका सभागृहातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे दस्तुरखुद्द महापौरांनी पाठ फिरविली. तर भाजपचेही नगरसेवक यावेळी अनुपस्थित होते. या प्रकारामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते दुखावले असून त्याचे पडसाद भविष्यात उमटण्याची चिन्हे आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची शनिवारी जयंती होती. केंद्र, राज्य आणि मुंबई महापालिकेतील भाजप-शिवसेना सस्थास्थानी असल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शनिवारी पालिका मुख्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सर्व तयारी करुन ठेवली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करण्यासाठी महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित राहतील अशी सर्वाना अपेक्षा होती. मात्र त्या आल्याच नाहीत. महापौर न आल्यामुळे अखेर स्थापत्य समितीचे (शहर) अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण केली आणि आदरांजली वाहिली. कार्यक्रमास भाजप नगरसेवकांची अनुपस्थिती जाणवत होती. हे प्रकरण भाजप नगरसेवकांना भोवण्याची शक्यता आहे. तसेच महापौरांच्या अनुपस्थितीमुळे शिवसेना वादात अडकण्याची शक्यता आहे.