हिंदू कथांमध्ये महाभारतात अर्जुनाने सोपाऱ्याच्या तीर्थस्थळा भेट दिली आणि इथेच जवळच असलेल्या एका तीर्थस्थळी त्याची राजवस्त्रे आणि दागिने ब्राह्मणांना दान देऊन मग त्याने प्रभास पट्टणाच्या दिशेने मार्गक्रमणेस सुरुवात केली, असा उल्लेख आहे. जैन, बौद्ध आणि हिंदू धर्मग्रंथांमध्ये सोपाराचा उल्लेख आढळतो.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

नालासोपाऱ्याचा पहिला उल्लेख सापडतो तो इसवी सनपूर्व २५० सालाचा. बौद्ध धर्माच्या प्रसारार्थ सम्राट अशोकाने धर्मरक्खित (धर्मरक्षित) नामक यवन भिक्खूला अपरांत म्हणजेच कोकणामध्ये पाठवले. यवन म्हणजे मुस्लीम असा समज आपण करून घेतला आहे. मात्र प्राचीन काळात यवन असा उल्लेख ग्रीक किंवा बॅक्ट्रीया म्हणजेच मध्य आशियातून आलेल्यांसाठी वापरण्यात आला. त्यामुळे तत्कालीन कोकणात धर्मप्रसारार्थ आलेल्या धर्मरक्षित या भिक्खूने त्याचे प्रमुख स्थान म्हणून शूर्पारक या राजधानीचीच निवड केली, असा उल्लेख सापडतो. बौद्ध धर्मग्रंथांमधील उल्लेखानुसार, त्याने येथील सात हजार क्षत्रियांचे धर्मातरण केले.

तत्कालीन अपरांत म्हणजे गुजरातमधील नवसारी ते कर्नाटकातील गोकर्णापर्यंतचा परिसर असा उल्लेखही वाचायला मिळतो. सोपारा किंवा शूर्पारक ही या अपरांतची राजधानी होती. म्हणूनच सम्राट अशोकाचा शिलालेख सोपाऱ्याला सापडतो. १८८२ साली त्या शिलालेखाचा एक भाग म्हणजे शिलाखंड सोपाऱ्याला सापडला. सम्राट अशोकाने एका यवन भिक्खूला इथे पाठवणे याचा अर्थ अभ्यासकांनी असा लावला आहे की, तत्कालीन अपरांतामध्ये व्यापाराच्या निमित्ताने येऊन स्थायिक झालेल्या यवनांची संख्या अधिक असावी. सम्राट अशोकाच्याच कालखंडात सौराष्ट्र- काठियावाड परिसरावर यवन राजा राज्य करत होता, त्याच्या नोंदीही सापडल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण किनारपट्टीवर यवनांची संख्या नोंद घेण्याजोगी असावी या गृहीतकाला पाठबळच मिळते.

याशिवाय सोपाऱ्याचा उल्लेख बौद्ध, हिंदू आणि जैन सर्वच धर्मामध्ये पवित्र तीर्थस्थळ म्हणून केला जातो, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. बौद्ध धर्मग्रंथांमध्ये म्हटले आहे की, गौतम बुद्धाच्या आधीच्या जन्मांमध्ये बोधिसत्त्व सुप्पारक म्हणून त्यांचा पूर्वजन्म सोपाऱ्यात झाला होता. सोपाऱ्यातील एक प्रमुख व्यापारी पूर्ण याच्या विनंतीवरून बुद्धांनी सोपाऱ्याला पुन्हा एकदा भेट दिली. त्यांच्याभेटीच्या स्मरणार्थ इथे एक स्तूप बांधण्यात आला, असाही उल्लेख आढळतो. जैन धर्मग्रंथांमध्ये म्हटले आहे की, सोपाऱ्याचा राजा महासेन याची मुलगी तिलकसुंदरी हिच्याशी श्रीपाल या जैन राजाचा विवाह झाला. त्याचप्रमाणे जैनांच्या ८४ तीर्थस्थळांमध्ये सोपाऱ्याचा समावेश होतो, कारण र्तीथकरांपैकी एकांचा जन्म सोपाऱ्याचा आहे, असे मानले जाते. एका विशिष्ट जैन पंथांचा जन्मच सोपाऱ्यामध्ये झाला असून तो पंथ ‘सोपारक गच्छा’ म्हणून ओळखला जातो. हिंदू कथांमध्ये महाभारतात अर्जुनाने सोपाऱ्याच्या तीर्थस्थळा भेट दिली आणि इथेच जवळच असलेल्या एका तीर्थस्थळी त्याची राजवस्त्रे आणि दागिने ब्राह्मणांना दान देऊन मग त्याने प्रभास पट्टणाच्या दिशेने मार्गक्रमणेस सुरुवात केली, असा उल्लेख आहे. तिन्ही प्रमुख धर्मग्रंथांमध्ये अशा प्रकारे सोपाऱ्याचा उल्लेख पवित्र स्थान म्हणूनच येतो.

सोपाऱ्यातील धर्मोत्तरीय भिक्खूच्या नातेवाईकाने कार्ले लेणीमध्ये एका स्तंभासाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. नाहपण क्षात्रपाचा जावई उसवदाता याने सोपाऱ्याला एका विहारासाठी दान दिल्याचा उल्लेख नाशिकच्या लेणींमध्ये आहे. नाणेघाटामध्ये एका पाण्याच्या टाक्याचे दान सोपाऱ्याचा व्यापारी असलेल्या गोविंददासाने केल्याचा उल्लेख वाचायला मिळतो.

तिसऱ्या शतकापासून आजवर भारतात येऊन गेलेल्या अनेक पर्यटक, व्यापारी आणि भिक्खूंच्या प्रवासनोंदींमध्ये सोपाऱ्याचा उल्लेख येतोच येतो. टोलेमी दुसऱ्या शतकाच्या मध्यावर येऊन गेला. नवसारी आणि चेमूल (अलिबागजवळचे चौल) यांच्यामध्ये सोपारा नावाचे बंदर असल्याचा उल्लेख तो करतो. पेरिप्लस ऑफ एरिथ्रिअन सी म्हणजे खरे तर भारताबाहेरच्या व्यापाऱ्याने लिहिलेले व्यापाऱ्यांचे गाइडबुकच. त्यामध्येही भृगुकच्छ (आताचे भडोच) आणि कलियाण (कल्याण) यांच्यामध्ये उप्पारा नावाचे महत्त्वाचे बंदर असल्याचा उल्लेख त्यात आहे. सहाव्या शतकामध्ये कोसमास इंडिकोप्लुटस हा ग्रीक व्यापारी आणि भिक्खू येऊन गेला. त्याने कलियाणजवळच्या सोबोर नावाच्या बंदराचा उल्लेख केला आहे ते सोपाराच असावे असे तज्ज्ञांना वाटते.

१०व्या शतकातील अरब प्रवासी मकौडी सुबारा असा सोपाऱ्याचा उल्लेख ठाण्यासोबतच करतो. त्यानंतर चाळीस वर्षांनी आलेला इब्न हौकाल सुबारा असा सोपाऱ्याचा उल्लेख करतो. तर प्रसिद्ध अल बिरुनीदेखील सुबारा असाच सोपाऱ्याचा उल्लेख ठाण्याला पोहोचण्यापूर्वीचे महत्त्वाचे बंदर म्हणून करतो.

देशाच्या इतिहासामध्ये इसवी सनपूर्व कालखंडापासून काश्मीरचे महत्त्व अबाधित राहिले आहे. शैव, शाक्त, बौद्ध या सर्व धर्माच्या प्रसारामध्ये काश्मीरने बजावलेली भूमिका महत्त्वाची आहे. अनेक महत्त्वाच्या धर्म आणि साहित्य परिषदा त्या वेळेस काश्मीरमध्ये पार पडल्या आहेत. यात एक महत्त्वाची साहित्य परिषद ११३५ ते ११४५ या कालखंडात काश्मीरमध्ये पार पाडली. त्यात सहभागी होण्यासाठी अपरांतचा राजा अनंतदेव याने आपला विश्वासू असलेला सोपाऱ्याचा विद्वान तेजकांथा याला पाठवले होते, असे आढळते. मध्ययुगात मुस्लीम सत्ता आली, त्यापाठोपाठ आलेले पोर्तुगीजही इथेच वसले. पोर्तुगीजांच्या कालखंडामध्ये वसई किल्ला चांगलाच आकारास आला आणि मग त्यानंतर सोपाऱ्याचे महत्त्व कमी होत गेले..

विनायक परब vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab