मुंबई पोलिसांच्या मालमत्ता विभागाने अभिनेता विंदू दारांसिग रंधवा याची कसून चौकशी सुरू केली असून गेल्या तीन वर्षांपासून क्रि केटच्या सामन्यांवर आपण सट्टेबाजी करीत असल्याची कबुली त्याने दिली आहे. क्रिकेटपटूंना मॅच फिक्सिंगसाठी मॉडेल्स आणि अभिनेत्री पुरविल्या जात असल्याचा पोलिसांचा संशय असून विंदूचाही त्यात काही सहभाग आहे का त्याचाही पोलीस तपास करत आहेत.
दिवंगत अभिनेते दारासिंग याचा मुलगा वीरेंद्र उर्फ विंदू हा पोलिसांसाठी महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता आहे. विंदू केवळ ‘आयपीएल’च नव्हे तर गेल्या तीन वर्षांत क्रिकेटचे जेजे सामने झाले त्यात सट्टा लावत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आपण सट्टा लावतो, इतरही लावतात त्यात गैर काय असा उलट सवालही त्याने केला. विंदू हा सट्टेबाज पवन जयपूर, संजय जयपूर आणि ज्युपीटरच्या संपर्कात होता. त्यांच्या मार्फत तो सट्टा लावत होता. एका बुकीबरोबरचे त्याचे संभाषण पोलिसांनी टॅप केले आहे. आपल्या दोन मित्रांनाही त्याने अशाच पद्धतीने सट्टा लावण्यास भाग पाडले होते. सट्टेबाज खेळाडूंना मॅच फिक्सिंगसाठी ‘हनी ट्रॅप’चाही वापर करत असून त्यासाठी ते मॉडेल्स आणि अभिनेत्रींचा वापर केला जात आहे.
विंदूचा त्यात काही सहभाग आहे का ते पोलीस तपासत आहेत. जुन्या काळातील अभिनेता आणि सध्याच्या आघाडीच्या एका अभिनेत्याचे नावही मुंबई पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्यांनाही ताब्यात घेतले जाईल असे पोलीस सुत्रांनी सांगितले.