जुहू येथील पृथ्वी थिएटरजवळील जानकी कुटीरमधील विनोद ब्रोकर यांच्या बंगल्याचा सौदा ४० कोटी रुपयांना झाला होता. प्रत्यक्षात मात्र नऊ कोटींचा करार करण्यात आला होता आणि ३१ कोटी रुपये रोखीच्या स्वरूपात दिले जाणार होते. मात्र ही रक्कम द्यावी लागू नये, यासाठी ब्रोकर यांची हत्या करण्यात आल्याची नवी माहिती चौकशीत उघड झाली आहे.
या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहकार्याने पुणे पोलिसांनी आतापर्यंत २८ वर्षांचा इस्टेट एजंट इब्राहिम शेख याच्यासह दोघांना अटक केली आहे. या बंगल्याच्या खरेदीपोटी चार कोटी रुपये दिल्याचा दावा इब्राहिमने केला होता. आणखी पाच कोटी रुपये द्यायचे होते, तसेच उर्वरित ३१ कोटी रक्कम रोखीच्या स्वरूपात द्यायची होती, अशी माहिती चौकशीत स्पष्ट झाली होती. याप्रकरणी पुणे पोलीस पुढील तपास करीत असले तरी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी उपनिबंधकांकडील नोंदीची शहानिशा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु अशा पद्धतीचा कुठलाही सौदा झाला नसल्याचे आढळून आले आहे. मात्र याबाबतच्या करारनाम्यावर विनोद ब्रोकर यांच्या सह्य़ा आढळून आल्या आहेत. या सह्य़ा एकतर हत्येपूर्वी जबरदस्तीने घेतल्या असण्याची शक्यता आहे वा बनावट सह्य़ा केल्या असाव्यात, असा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 4:03 am