मुंबईतील इनऑर्बिट मॉलमध्ये रविवारी दुपारी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि गायक अंकित तिवारीचा भाऊ अंकुर तिवारी या दोघांमध्ये बाचाबाची झाली. अंकुरच्या वडिलांनी विनोद कांबळीच्या पत्नीसोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप असून अंकुर तिवारींनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

रविवारी दुपारी विनोद कांबळी, त्याची पत्नी अँड्रिया हे दोघे इनऑर्बिट मॉलमध्ये गेले होते. तर अंकुर तिवारी, त्यांचे वडील, पत्नी आणि मुलांसह मॉलमध्ये गेले होते. विनोद कांबळी आणि अँड्रियाने अंकुर तिवारीच्या वडिलांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. अंकुर तिवारीचे वडील मला वारंवार स्पर्श करत होते, असे अँड्रियाचे म्हणणे आहे. यावरुन हा वाद टोकाला पोहोचला की अँड्रियाने अंकुर व त्यांच्या कुटुंबियांना चपलेने मारण्याचा प्रयत्न देखील केला. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

विनोद कांबळीने ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजता मॉलमध्ये त्याच्या पत्नीसोबत एक वृद्ध माणूस असभ्य वर्तन करत होता. तो वृद्ध व्यक्ती वारंवार अँड्रियाला स्पर्श करत होता. सुरुवातीला अनावधानाने हा प्रकार घडला असावा असे अँड्रियाला वाटत होते. मात्र, काही वेळाने हा प्रकार जाणूनबुजून सुरु असल्याचे तिच्या लक्षात आले. यानंतर अँड्रियाने त्या वृद्ध व्यक्तीला धक्का दिला आणि आम्ही तिथून निघून गेलो, असे विनोद कांबळीने सांगितले. काही वेळाने मॉलच्या फूड कोर्टमध्ये त्या वृद्ध व्यक्तीच्या दोन मुलांनी आम्हाला गाठले. त्यांनी माझ्या पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना रोखले असता त्यांनी मला देखील धमकावले, असे कांबळीने नमूद केले.

अँड्रिया म्हणाली, तो व्यक्ती गर्दीचा फायदा घेऊन मला स्पर्श करत होता. मी मुलांसोबत खेळतानाही हा प्रकार सुरुच होता. मी काही बोलणार नाही, असे त्याला वाटत होते. पण आता तो काळ गेला आहे. अशा गोष्टींविरोधात महिलांनी कठोर भूमिका घ्यायलाच हवी, असे तिने सांगितले.

अंकुर तिवारी यांनी कांबळी दाम्पत्याने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. माझे वडील हे निवृत्त बँक कर्मचारी आहे. ते माझ्या मुलीला घेऊन गेम झोनमध्ये गेले होते. विनोद कांबळी आणि एका महिलेने मारहाण तसेच धक्काबुक्की केल्याचे त्यांनी मला सांगितले. यानंतर आम्ही विनोद कांबळीचा शोध घेतला आणि या घटनेबाबत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, असे अंकुर तिवारींनी सांगितले.

‘मी कांबळी दाम्पत्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला देखील धक्काबुक्की केली आणि मला शिवीगाळ केली. कांबळीच्या पत्नीने चपलेने मारण्याची धमकी दिली’, असेही त्यांनी सांगितले. ‘आमच्यातील वादाचे काही लोकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना देखील कांबळीने शिवीगाळ केली आणि त्यांना मोबाईलमधील शुटिंग डिलीट करण्यास भाग पाडले’, असे अंकुर यांनी सांगितले.