शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची कबुली

‘शिक्षकांचे ऑनलाइन काम वाढले आहे हे खरे आहे. शाळाबाह्य़ काम कमी होणेही आवश्यक आहे,’ अशी कबुली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना दिली. मात्र त्याचवेळी ‘ऑनलाइन काम विनोद तावडेच शिक्षणमंत्री झाल्यावर वाढले नाही, ते आधीपासूनच होते, तेव्हा कधी शिक्षक संघटनांची ओरड झाली नाही,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Centers for training of medical teachers are insufficient in the state
राज्यात वैद्यकीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी केंद्र अपुरे; वैद्यकीय शिक्षक संघटना म्हणते…
Palghar, teachers election training,
पालघर : निवडणूक प्रशिक्षणाकरिता शिक्षकांची तारांबळ, मुल्यांकन चाचणी व निवडणूक प्रशिक्षण एकाच वेळेत
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

सततचे अहवाल, ऑनलाइन माहिती भरणे, अभियाने राबवणे अशा अशैक्षणिक कामांबाबत राज्यातील शिक्षकांनी गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. चाळीसहून अधिक नोंदवह्य़ा, १९ शिष्यवृत्ती योजनांचे तपशील, जवळपास पंचवीस अहवाल शिक्षकांना द्यावे लागतात. त्याचप्रमाणे सरल प्रणालीवर माहिती संकलन करण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी यांमुळे शिक्षक बेजार झाले आहेत. याबाबत शिक्षकांवरील ऑनलाइन कामाचा भार वाढला असल्याची कबुली तावडे यांनी दिली.

ते म्हणाले, ‘शिक्षकांच्या आंदोलनाबाबत मी काही मुद्दय़ांशी सहमत आहे. शिक्षकांची ऑनलाइन कामे वाढली आहेत हे खरे आहे. प्रत्येक कामासाठी किती वेळ लागतो, त्यातील अडचणी काय आहेत याबाबत शिक्षक संघटनांशी पुढील आठवडय़ात चर्चा करणार आहे. वेगवेगळ्या परीक्षा आणि योजनांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरावे लागतात. मात्र विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित झाली की वेगवेगळे अर्ज भरण्याचे काम हलके होऊ शकेल. सरलचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे, विद्यार्थ्यांच्या आधार कार्डच्या नोंदणीचे काम ८० टक्के झाले आहे. शिक्षकांची शाळाबाह्य़ कामेही कमी होणे आवश्यक आहे. मात्र ही कामेही आधीपासून आहेत. ती कशी कमी करता येतील याबाबतही विचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शाळांच्या वर्षभराच्या वेळापत्रकात कोणत्या दिवशी अजिबात शाळाबाह्य़ कामे असू नयेत याबाबतही निर्णय घेण्यात येईल.

..तेव्हा संघटना कुठे होत्या?

शिक्षकांच्या शाळाबाह्य़ आणि अशैक्षणिक कामांबाबत  अधिवेशनाच्या काळात नागपूर येथे मोर्चा काढण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.‘शाळाबाह्य़ कामे  आधीपासूनच होती. आता जे नेते शिक्षक संघटनांबरोबर मोर्चात सहभागी होत आहेत, त्या नेत्यांच्या पक्षाचे सरकार असतानाही शाळाबाह्य़ कामे होतीच. तेव्हा शिक्षक संघटना का शांत होत्या?’ अशी टिप्पणी तावडे यांनी केली.

अभियाने आमची नाहीत..

‘राज्य शासन सतत अभियाने, विशेष दिवस साजरे करण्याच्या सूचना देत नाही. त्या सूचना मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या असतात,’ अशी भूमिका तावडे यांनी घेतली. ते म्हणाले, ‘मुलांना सतत कोणत्या तरी अभियानासाठी आणि कार्यक्रमांत गुंतवणे योग्य नाही. कधी झाडे वाचवा फटाकेमुक्ती असे कशात तरी विद्यार्थी सतत गुंतलेले असतात. राज्य शासनाकडून अशी अभियाने चालवली जात नाहीत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून त्याच्या सूचना येतात. अभियानांमुळे विद्यार्थीही वर्गाबाहेर जाण्याची वेळ आली आहे.’

आमच्या हाती काहीच नाही..

वादग्रस्त परिपत्रकांपासून ते विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्यापर्यंतच्या विविध प्रश्नांवर काही करण्यास शिक्षण विभाग असमर्थ असल्याचे तावडे यांनी दर्शवले. ‘राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या ग्रामविकास विभाग चालवतो. शहरातील शाळा पालिका चालवते. आमच्या हाती फक्त अनुदानित शाळा आहेत. एखाद्या जिल्ह्य़ाच्या स्तरावर वादग्रस्त परिपत्रक निघते त्याच्याशी शिक्षण विभागाचा काहीच संबंध नसतो.’