News Flash

अकरावी प्रवेश घोळप्रकरणी ‘न्यासा’ कंपनीवर कारवाई

विनोद तावडे यांची विधानसभेत घोषणा

शिक्षणमंत्री विनोद तावडे ( संग्रहीत छायाचित्र )

विनोद तावडे यांची विधानसभेत घोषणा

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमधील दिरंगाई व त्रुटीबाबत या प्रवेश प्रक्रियेचे काम पाहणाऱ्या ‘न्यासा एशिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जात केलेल्या चुकांमुळे काही विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून दूरची महाविद्यालये मिळाल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.

राज्यातील ११वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबईसह सात विभागीय केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रक्रियेत अनेक ठिकाणी घोळ झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विजय वडेट्टीवार, सुनील प्रभू, वर्षां गायकवाड आदी सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्यावर बोलताना तावडे यांनी ही माहिती दिली. मुंबई, पुणे येथील विद्यार्थी संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. एकटय़ा मुंबईत दोन लाख ६८ हजार विद्यार्थी आहेत. त्यामुळे एकाच वेळी या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आठ लाख जणांच्या लॉगइन करण्याची क्षमता असणाऱ्या सव्‍‌र्हरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्या तुलनेत प्रवेशासाठी १५ लाख लोकांनी लॉगइन केले. त्यामुळे या सव्‍‌र्हरची क्षमता वाढविण्यासाठी सव्‍‌र्हर बदल करताना अडचणी उद्भवल्या होत्या. त्यामुळे स्वत: गुणवत्ता यादीचे निरीक्षण करून पहिली प्रवेशाची यादी प्रसिद्ध केली. कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ  नये म्हणून संपूर्ण सांख्यिकीय माहिती बारकाईने तपासण्यामुळे ही यादी प्रसिद्ध करण्यास विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले.

२४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरताना विहित पद्धतीचा अवलंब न केल्याने चूक झाली होती मात्र या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. यंदा कला शाखेला जास्त मागणी असल्याने महाविद्यालयांनी मागणी केल्यानुसार वाढीव तुकडय़ांना मान्यता देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता व त्या विद्यार्थ्यांने दिलेल्या महाविद्यालयाचा पसंतीक्रम यावर अवलंबून आहे. या ऑनलाइन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना लांबच्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो ही व्यावहारिक अडचण आहे. यासंदर्भात लवकरच लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येईल व आवश्यकता पडल्यास राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा करण्यात येईल असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2017 1:22 am

Web Title: vinod tawde comment on fyjc admission scam
टॅग : Vinod Tawde
Next Stories
1 आमदाराच्या वेतनातून थकित कर्ज वसूल करण्याची परवानगी हवी!
2 विश्वास पाटलांविरोधात गुन्हा दाखल करा; झोपडपट्टी पुनर्विकास भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाचे आदेश
3 उत्तरपत्रिकांची शोधाशोध!
Just Now!
X