शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती

आरक्षणाची मागणी करीत राज्यातील मराठा समाज मोठय़ा संख्येने आंदोलने उभी करत असताना राज्यात केवळ साडे सात हजार शासकीय नोकऱ्या उपलब्ध असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात स्पष्ट केले. शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातील तरूण वर्ग रस्त्यावर उतरला आहे. यावर राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही विनोद तावडे यांनी दिली.  राज्य शासनाने संकलित केलेल्या माहितीनुसार केवळ साडे सात हजार शासकीय नोकऱ्या उपलब्ध असताना आरक्षणामुळे तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार नसल्याचे तावडे यांनी मुंबईत एका कार्यक्रमात सांगितले.

राज्यात ठिकठिकाणी सरकारी सेवेतील नोकऱ्यांची संख्या कमी करण्यात आल्यामुळे स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या, तसेच विविध विभागांतील पदवीधरांनी मोर्चे काढले आहेत. पुणे, नांदेड, बुलढाणा, अमरावती, औरंगाबाद येथे विद्यार्थ्यांनी नोकरीभरतीसाठी गेल्या आठवडय़ात आंदोलन केले . या पाश्र्वभूमीवर तावडे यांची नोकऱ्यांसंदर्भातील आकडेवारी विद्यार्थ्यांच्या मोर्चातील हवा काढून घेणारी आहे.  सरकारी नोकरीच्या ९० हजार जागा रिक्त आहेत. पण अघोषित नोकरभरती बंदी करून सरकारने या जागा भरायला नकार दिला असल्याची तक्रार सरकारवर होत आहे.  जेथे ५०० ते ७०० जागांसाठी जाहिरात दिली पाहिजे तेथे केवळ ५० ते ७० जागांसाठी लोकसेवा आयोग जाहिरात काढत असल्याची टीकाही होत आहे.