येत्या तीन वर्षांत जे. जे. रुग्णालय एम्सच्या धर्तीवर सुसज्ज करण्यात येईल. तसेच येणाऱ्या काळात जे. जे. रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्यात येईल आणि हे रुग्णालय उत्तम दर्जाचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय म्हणून नावारूपास आणले जाईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली. जे. जे. रुग्णालय समूहाच्या आवारात एका समारंभात ते बोलत होते.
महाराष्ट्रातील विविध शासकीय महाविद्यालयात सुमारे वीस वर्षांपासून बदली कामगार म्हणून कार्यरत असलेल्या संवर्ग ४ मधील ७७४ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला.
या कर्मचाऱ्यांपैकी जे. जे. रुग्णालय समूहातील ४७४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांपैकी आज १५ बदली कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कायम सेवेचे नियुक्तिपत्र तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कर्मचाऱ्यांची म्हणणे थेट तावडे यांच्यापर्यंत पोहोचवावीत त्यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या आवारात त्यांच्या प्रश्नांसाठी एक बॉक्स तयार करण्यात येईल. त्यामध्ये कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न पाठवावेत, त्या प्रश्नांची योग्य प्रकारे सोडवणूक करण्यात येईल, असेही विनोद तावडे यांनी या वेळी सांगितले.
याप्रसंगी विभागाच्या सचिव मेधा गाडगीळ, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. लहाने, संचालक शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते.