शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. दोघांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, अचानक झालेल्या या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. ठाण्यात होऊ घातलेल्या नाट्यसंमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी विनोद तावडे गेल्याचीही चर्चा आहे.

जवळपास एक तास तावडे हे कृष्णकुंजवर होते. यादरम्यान त्यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती आहे, पण नेमकी कोणत्या मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई आणि कोकणातील शिक्षक-पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचंही म्हटलं जात आहे. गिरीश महाजन यांनी कालच छगन भुजबळ यांची भेट घेतली होती, तर आज तावडे आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.