|| संतोष प्रधान

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कोणी किती जागा लढवायच्या याचा वाद गेले सहा महिने रंगला होता. शेवटी गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच २६-२२ जागांचे सूत्र कायम राखण्यात काँग्रेसला यश आले. राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा आघाडीत वाटय़ाला आल्या असल्या तरी आता राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचे काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची तयारी आणि संघटन लक्षात घेता काँग्रेससाठी राज्यात निवडणूक सोपी नाही.

राज्यात काँग्रेसची ताकद कमी झाल्याने समसमान म्हणजे २४ जागा मिळाल्या पाहिजेत, अशी राष्ट्रवादीची मागणी होती. काँग्रेसने सुरुवातीपासून ही मागणी फेटाळली होती. दिल्लीत झालेल्या बैठकीतही २६ जागा काँग्रेस तर २२ जागा राष्ट्रवादी हेच सूत्र कायम ठेवावे, असा आग्रह काँग्रेसने धरला होता. जागांची अदलाबदल करण्याचीही राष्ट्रवादीची मागणी होती. पण आघाडीत जागावाटपात संख्याबळाचे २६-२२चे सूत्र कायम राहिले तसेच जागांची अदलाबदलही झाली नाही.

काँग्रेस व राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या सूत्रानुसार काँग्रेसच्या वाटय़ाला २६ जागा तर राष्ट्रवादीला २२ जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांनी आपापल्या कोटय़ातील प्रत्येकी दोन जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. यानुसार काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागा लढणार आहे. चार जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत.

जास्त जागांची मागणी पदरात पाडून घेण्यात काँग्रेसचे नेते यशस्वी झाले असले तरी जास्त जागा निवडून आणण्याचे मोठे आव्हान काँग्रेसला पार पाडावे लागणार आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीने चार तर काँग्रेसने दोनच लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. पोटनिवडणुकीत विजयामुळे राष्ट्रवादीच्या खासदारांचे संख्याबळ पाच झाले होते. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसची वाटचाल चाचपडत सुरू आहे. नांदेडचा अपवाद वगळल्यास कोणतीही जागा हमखास निवडून येईल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही. अहमदनगरची जागा विखे-पाटील यांना मिळाली असती तर काँग्रेसच्या संख्याबळात वाढ झाली असती. पण नेमके हेच हेरून राष्ट्रवादीने खोडा घातला, असे काँग्रेस नेत्यांचे मत झाले आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विजयानंतर राज्यात काँग्रेसला वातावरण अनुकूल होते. पण हे वातावरण टिकविण्यात राज्यातील काँग्रेस नेत्यांना अपयश आले. ग्रामीण भागात भाजप सरकारच्या विरोधात नाराजी असली तरी त्याचाही लाभ काँग्रेसने पाहिजे तसा उठविलेला नाही. काँग्रेसमध्ये एकूणच विस्कळीतपणा जाणवतो. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीने बारामती, सातारा, माढा, रायगड, परभणी, भंडारा-गोंदिया, कोल्हापूर, अहमदनगर या मतदारसंघांमध्ये सारी ताकद पणाला लावली आहे. जनतेचा विश्वास संपादन करण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे असेल. २०१४च्या प्रमाणे काँग्रेसच्या विरोधात एवढे वातावरण नाही. तरीही काँग्रेसला त्याचा राजकीय लाभ उठविणे शक्य झालेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५६ इंची छातीच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत ५६ पक्ष व संघटना एकत्र आले असले तरी मोदी यांच्यापुढे त्यांचा टीकाव लागणार नाही.    – विनोद तावडे, भाजप नेते