‘नीट’बाबत मार्ग न निघाल्यास राष्ट्रपतींकडे दाद मागण्याचा राज्य सरकारचा निर्धार
‘नीट’ सक्तीविरोधात केंद्र व राज्य सरकारकडून गतीने पावले टाकली जात नसल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत असून मोर्चे, निदर्शने, पालक सभा व अन्य माध्यमांतून आणि राजकीय नेत्यांकडूनही आवाज उठविण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारवर तोडग्यासाठी दबाव वाढत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने ‘नीट’मधून तोडगा काढण्यासाठी अधिसूचना काढण्याच्या पर्यायावर १६ मे रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी बोलाविलेल्या बैठकीत प्रयत्न केला जाईल. तरीही प्रश्न न सुटल्यास राज्यातील खासदारांना घेऊन राष्ट्रपतींकडे जाऊन मार्ग काढण्याची विनंती केली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ सक्ती केल्याने आता केंद्र सरकारने कोणता तोडगा काढावा, यावर चर्चा करण्यासाठी नड्डा यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक १६ मे रोजी बोलाविली आहे. त्यावर केंद्र सरकारच्या पातळीवर कोणते मार्ग अवलंबिता येतील, यावर विचार करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे तावडे यांनी सांगितले. पण तरीही हा प्रश्न न सुटल्यास राष्ट्रपतींना निवेदन देऊन त्यांनाही विद्यार्थीहितासाठी तोडगा काढण्याची विनंती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपतींना या प्रकरणात मार्ग काढण्याचे कोणते अधिकार आहेत, केंद्र सरकारने पावले टाकणे अपेक्षित आहे, यासंदर्भात विचारता राष्ट्रपतींना घटनेनुसार अधिकार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.
‘नीट’ परीक्षा द्यावी लागलीच तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दूरदर्शन, काही खासगी वाहिन्या, मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स व वेबसाइटच्या माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे खासगी क्लासचालकांचे धाबे दणाणले असल्याचा दावा तावडे यांनी केला. याउलट परिस्थिती असून ‘नीट’सक्तीमुळे खासगी क्लासचालकांचा धंदा तेजीत आहे.
दरम्यान, राज्यभरात अनेक ठिकाणी ‘नीट’सक्तीविरोधात निदर्शने होत आहेत. तातडीने मार्ग काढला जात नसल्याने केंद्र व राज्य सरकारविरोधात पालक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

 

आयुर्वेदिक, होमिओपथी व अन्य प्रवेश राज्याच्या सीईटीनेच – विनोद तावडे
वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेशांवर ‘नीट’ परीक्षेची टांगती तलवार असली तरी आयुर्वेदिक, होमिओपथी, युनानी, फार्मसी आदी सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्य सरकारच्या प्रवेशपरीक्षेमार्फतच होतील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
त्यामुळे किमान अन्य विद्याशाखांसाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तरी ‘नीट’ची सक्ती होणार नसून राज्य सरकारच्या प्रवेशपरीक्षेतील गुणांच्या आधारेच प्रवेश मिळेल. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राच्या वेगवेगळ्या विद्याशाखांसाठी नीट व सरकारी अशा दोन्ही प्रवेशपरीक्षा विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार आहेत.
वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेशांसाठी ‘नीट’ सक्तीचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (वैद्यकीय शिक्षण परिषद) या शिखर संस्थेने त्याबाबत अधिसूचना जारी केली होती.
वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २४ जुलै रोजी ‘नीट’ परीक्षा घेतली गेली, तरी अन्य विद्याशाखांसाठी मात्र ‘नीट’चे गुण विचारात घेतले जाणार नाहीत, असे तावडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘नीट’ सक्ती कायम राहिली तर वैद्यकीय, दंतवैद्यकीयबरोबरच होमिओपथी, आयुर्वेदिक या विद्याशाखांकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांसाठी तयारी करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.