नियम डावलून कोट्यवधी रुपयांच्या खरेदीला मंजुरी दिल्यामुळे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चौकशीला सामोरे जावे आणि निर्दोष असल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी बुधवारी पत्रकाद्वारे केली.
या पत्रकात म्हटले आहे की, आग लागल्याशिवाय धूर दिसत नाही, असे म्हणतात. त्यामुळे या प्रकरणातील सत्य महाराष्ट्रातील जनतेसमोर यायलाच हवे. सरकारने तावडे आणि मुंडे या दोघांची चौकशी करावी. या चौकशीच्या काळात दोघांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आपण आघाडी सरकारपेक्षा वेगळे आहोत, हे जनतेला दाखवून द्यावे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
‘पार्टी विथ अ डिफरन्स’ म्हणवून घेणारा भाजपही मागील सरकारप्रमाणे वागताना दिसत आहे, अशी टीका करून १४ वर्षे सत्तेबाहेर राहिल्यामुळे यांची ‘भूक’ वाढली आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. युती सरकारसुद्धा आघाडी सरकारचीच धोरणे आणि दर करार पुढे रेटताना दिसत आहे, असाही आरोप करण्यात आला आहे.