मराठी साहित्यिकांनी फुकटेगिरी आधी बंद करावी, असा सल्ला देऊन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी साहित्यिकांचा अवमान केला असून, त्यांची विधाने म्हणजे सत्तेचा उन्माद व्यक्त करणारी आहेत. तावडे यांनी साहित्यिकांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
विरोधी पक्षनेते असताना सरकारच्या कोणत्याही कृतीवर विरोधात बोलणारे तावडे सत्तेत जाताच बदलले. मराठी साहित्य संमेलनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्याची साहित्यिकांची मागणी काहीच चुकीची नाही. या मागणीचा विचार करण्याऐवजी फुकटेगिरी करू नका, असा सल्ला देऊन तावडे यांनी मराठी साहित्यिकांचा अपमान केला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. केंद्रात भाजपचेच सरकार असताना आपले वजन वापरून दूरदर्शनवर मोफत थेट प्रक्षेपण करण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी वास्तविक प्रयत्न करणे आवश्यक होते; पण तावडे यांचे दिल्लीदरबारी तेवढे वजन पडत नाही हे सिद्ध होते. यातूनच त्यांनी साहित्यिकांना फुकट काही मागू नका, असा सल्ला दिला असावा, असे मत सावंत यांनी व्यक्त केले आहे. केंद्रात काँग्रेस सरकार असताना असा प्रकार झाला असता, तर तावडे यांनी किती गळा काढला असता; पण आता तेच तावडे साहित्यिकांच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. यावरून तावडे आणि भाजप नेत्यांचे मराठी प्रेम किती बेगडी आहे हेच स्पष्ट होते, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.