केंद्रात व राज्यातही काँग्रेस आघाडी सरकार असताना इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही. मात्र केंद्रात सत्तापरिवर्तन होताच भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या प्राधान्यक्रमावर इंदू मिल व आंबेडकर स्मारकाचा मुद्दा आणला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात इंदू मिल जमीन हस्तांतरणाचा निर्णय लवकर करावा, अशी मागणी केली आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन मिळण्यासाठी रिपब्लिकन सेना व रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी २०११ मध्ये उग्र आंदोलने केल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी इंदू मिलची जमीन आंबेडकर स्मारकासाठी देण्याचे मान्य केले. मात्र त्यासाठी लागणारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. राज्यातील काँग्रेस आघाडी सरकार फक्त आश्वासनेच देत राहिले. अर्थात लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका काँग्रेसला बसला. काँग्रेस सरकारच्या निष्क्रियतेचा अचूक फायदा घेत भाजपने आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन हा मुद्दा आता आपल्या अजेंडय़ावर आणला आहे. इंदू मिलच्या जमिनीचे राज्य सरकारकडे हस्तांतरण करण्याची कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी विनंती तावडे यांनी केली आहे.
मुंबईतील आंबेडकर स्मारकाबरोबरच, नवी मुंबई विमानतळ, ओव्हल मैदान-चर्चगेट-विरार एलिव्हेटेड कॉरिडॉर, सीएसटी-पनवेल हायस्पीड कॉरीडॉर, ऐरोली-कळवा ट्रान्स हार्बर लिंक इत्यादी विकास प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी तावडे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.