राज्यातील विविध रुग्णालयात होणारी औषध खरेदी आणि वैद्यकीय उपकरणे खरेदी यामध्ये सूसुत्रता आणण्याच्या दृष्टीने आणि ही प्रक्रिया अधिक सुकर करण्यासाठी लवकरच एकात्मिक महामंडळ स्थापन करण्याचा सरकारचा विचार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले.
नागपूर येथील अतिविशेषोपचार रुग्णालयातील डायलिसीस मशीन नादुरुस्त होण्याबाबतचा प्रश्न प्रा. जोगेन्द्र कवाडे, हेमंत टकले, किरण पावसकर आदी सदस्यांना उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना तावडे म्हणाले, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, ईएसआयसी, वैदयकीय औषध आणि शिक्षण संचालनालय यांच्यामार्फत चालविण्यात येणा-या रुग्णालयातील औषध व वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठीची सध्याची प्रकिया अतिशय क्लिष्ठ आहे. त्यामुळे या प्रक्रियेत होणा-या विलंबामुळे प्रत्यक्ष रुग्णालयातील रुग्णांना वेळेवर लाभ मिळत नसल्याच्या अडचणी पुढे येत आहेत. त्यांमुळे ही खरेदी प्रकिया सुकर करण्याच्या दृष्टीने एक नव्याने एकात्मिक महामंडळ स्थापन करुन महामंडळाकडे खरेदीची एकात्मिक नोंदणी झाल्यास ही खरेदी सुरळीत होईल. या महामंडळामध्ये सार्वजिनक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था आदी संबंधित विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल असेही तावडे यांनी स्पष्ट केले.