लांबलचक ‘रोल्स रॉईस’पासून जुन्या चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या ‘इम्पाला’पर्यंत आणि डौलदार राजहंसाच्या चिन्हाने लक्ष वेधून घेणाऱ्या ‘पॅकार्ड’पासून ‘लॅण्ड रोवर’पर्यंत दुर्मीळ मोटारगाडय़ा आणि दुचाकींनी रविवारी मुंबईकरांच्या मनाचा ठाव घेतला. निमित्त होते ‘द मोटूल’ प्रायोजित ‘विंटेज अ‍ॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया’कडून (व्हीसीसीसीआय) आयोजित करण्यात आलेल्या विंटेज कार रॅलीचे. या रॅलीत विविधरंगी शानदार आणि आलिशान जुन्या गाडय़ा मुंबईच्या रस्त्यांवरून ऐटीत धावल्या. दक्षिण मुंबईतील हॉर्निमन सर्कल ते वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

एकीकडे दररोज बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या आजच्या पिढीला जुन्या शतकाची आठवण उजळवणाऱ्या गाडय़ांचीही तेवढीच भुरळ पडते. त्यामुळेच घरच्या सदस्याप्रमाणे काळजी घेऊन जुन्या गाडय़ांची देखभाल करणारे अनेकजण मुंबईमध्ये आहेत. ‘व्हीसीसीसीआय’तर्फे  दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या विंटेज कार रॅलीमध्ये जुन्या गाडय़ांचा संग्रह करणाऱ्यांना त्यांच्या गाडय़ांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. यानिमित्ताने मुंबईकरांनादेखील शंभर वर्षांपूर्वीच्या दुर्मीळ मोटारगाडय़ा आणि दुचाकी वाहनांना पाहण्याची संधी मिळते. रविवारी सकाळी हॉर्निमन सर्कलजवळ अशाच जुन्या दुर्मीळ गाडय़ांची जत्रा भरली होती. यावेळी हॉर्निमन सर्कल ते वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत निघालेल्या या वाहनांना पाहण्यासाठी मुंबईकरांनी जागोजागी गर्दी केली. हॉर्निमन सर्कल, रिगल सिनेमा, कुलाबा, मरिन ड्राइव्ह, पेडर रोड, हाजी अली, सागरी सेतू, लीलावती रुग्णालय या मार्गाने मार्गस्थ होत या सर्व जुन्या गाडय़ा वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये दिमाखदार पद्धतीने दाखल झाल्या. मरिन ड्राइव्हवरून या गाडय़ांना जाताना पाहून अनेकांना जुन्या मुंबईची आठवण झाली.

या रॅलीमध्ये १९०३ ते १९८० या कालावधीतील सुमारे १७० गाडय़ांनी सहभाग घेतला होता. यावेळी १९०३ साली निर्मिती करण्यात आलेल्या अब्बास जसदानवाला यांच्या ‘हंबर’ गाडीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. तर नेहमी लोकप्रिय ठरलेल्या ‘रोल्स रॉईस’ आणि ‘मर्सिडीज’, ‘लॅण्ड रोव्हर’ या कंपन्यांच्या विविधरंगी गाडय़ांनी यंदाची रॅली गाजवली. ‘हडसन ग्रेट’, ‘बेन्टले’, ‘डायमलेर’, ‘फोर्ड’, ‘मॉरिस मायनर’, ‘डॉज किंग्जले’, ‘राईली’, चपटय़ा आकाराची ‘मर्सिडीज बेंझ’ या गाडय़ांनी मोटारप्रेमींची वाहवा मिळवली. तर ‘व्हेस्पा’, ‘लॅम्ब्रेटा’, ‘विजय सुपर’ या स्कूटर आणि ‘राजपूत’, ‘ट्रायम्फ’,‘बीएसए’, ‘रॉयल एन्फिल्ड’ या मोटारसायकलीही रॅलीत दिमाखात धावल्या.