नेहरू विज्ञान केंद्र येथे १ एप्रिलपर्यत प्रदर्शन सुरू

१८ व्या आणि १९ व्या शतकातील दुर्मिळ अशा मोटारगाडय़ा आणि दुचाकी पाहण्याची संधी मुंबईकरांसाठी उपलब्ध झाली असून यांचे प्रदर्शन नेहरू विज्ञान केंद्र येथे भरले आहे. सकाळी साडे दहा ते सहा वेळेत भरणारे हे प्रदर्शन १ एप्रिलपर्यत सर्वांसाठी खुले असणार आहे.

१८८६ ते १९५० या कालखंडातील दुर्मिळ मॉडेलच्या २७ मोटारगाडय़ा आणि १२ दुचाकी या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आल्या आहेत. अभियंते आणि रचनाकार यांच्या प्रयत्नांतून जतन केलेल्या या विविधरंगी आणि शानदार गाडय़ा पाहण्याची संधी साधून मुंबईकरांनी रविवारी या प्रदर्शनाला आर्वजून भेट दिली. या प्रदर्शनाचे वैशिष्टय म्हणजे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जगातली पहिली निर्मिती म्हणून गणली जाणाऱ्या बेन्झ पॅटन मोटरव्ॉगन ही कार. ३ जुलै १८८६ मध्ये कार्ल बेन्झ याने जर्मनीमध्ये या कारच्या इंजिनाचा शोध लावला होता. बेन्झची पहिल्या मोटारगाडी सोबतच रोल्स रॉयस, बेन्टली, हंबर, डेमलर, फोर्ड, पॅकार्ड, क्रिसलर आदी जुन्या परंतु अप्रतिम रचना असलेल्या कार या प्रदर्शनामध्ये दिमाखात उभ्या आहेत.

विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उगम होत असताना तयार केलेल्या या मोटारगाडय़ांच्या रचना, इंजिन यामधून जुन्या काळातील तंत्रज्ञांच्या, रचनाकरांच्या कामांची झलक पाहायला मिळते. काळानुसार मोटारगाडय़ांची रचना कशी बदलत गेली याचे उत्तम मांडणी या प्रदर्शनामध्ये पाहण्यास मिळत असून २० व्या शतकामध्ये मोटारगाडय़ा आणि दुचाकीच्या  इंजिनाच्या रचनांमध्ये होत गेलेले बदलही अनुभवायला मिळतात.

सुप्रसिद्ध अशा ‘बॉम्बे’ चित्रपटामध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया या अभिनेत्यांनी चित्रिकरण केलेली मोटारसायकलही या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. नेहरू विज्ञान केंद्र आणि विंटेज व क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले हे प्रदर्शन सकाळी १०.३० ते ६ या वेळेत १ एप्रिलपर्यत सर्वासाठी खुले करण्यात आले आहे.