४०० दुर्मिळ मॉडेलसह सुपर बाइक्सचीही झलक

‘वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन’च्या शतकमहोत्सवी वर्षांनिमित्त पार्क्‍सच्या वतीने रविवारी ‘व्हिन्टेज कार्स’चे संचलन आयोजित केले होते. या ‘पार्क्‍स ऑटो शो २०१९’मध्ये ऑडी, मर्सिडीज बेन्ज, अ‍ॅस्टन मार्टिन, पोर्शे, फेरारी, बेन्टले, रोल्स रॉइस यांसारख्या ४०० व्हिन्टेज कार, मोटार सायकलसह, सुपरकार आणि सुपर बाइक्स सहभागी झाल्या होत्या.

संचलनाची सुरुवात सकाळी साडेअकरा वाजता झाली. वांद्रे-वरळी सी लिंक, एनएससीआय, हाजी अली, पेडर रोड, बाबूलनाथ, गिरगाव चौपाटी, मरिन ड्राइव्ह, एशियाटिक लायब्ररी, रिझव्‍‌र्ह बँक या रस्त्याने बलार्ड इस्टेट येथे याची सांगता झाली. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनप्रेमींची गर्दी जमली होती.

तत्पूर्वी ही दुर्मीळ वाहने वांद्रे कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. ऑडी, मर्सिडीज, मॅसरेटी, लॅम्बोर्गिनी, अस्टन मार्टन, पोर्श, फेरारी, बेंटले आणि रोल्स रॉइस अशा प्रसिद्ध सुपर आणि लक्झरी कार ब्रँड्ससोबतच सुपर कार्सचा भव्यदिव्य ताफा असलेला हा भारतातील अनोखा सोहळा शहरात रविवारी रंगला. वाहनप्रेमींच्या उत्साहात या सोहळ्याचा रविवारी समोराप झाला.