News Flash

मुंबई बडी बांका : तसबिरीचा कारखाना

आज ती भलेही भाबडी वाटते. पण ती खूपच सुंदर आहे.. छानशा कॅमेऱ्याने तिची तसबीर काढून ठेवावी इतकी सुंदर!

मुंबईतील हॉटेल वॉट्सन. छायाचित्र सन १८६३. दुसऱ्या छायाचित्रात १९व्या शतकाच्या उत्तरार्धातील मुंबईकर महिला.

मुंबईत.. (खरे तर सगळीकडेच..) हल्ली कुठेही पाहिले, तर कोणी तरी कोणाचे वा कशाचे तरी किंवा अगदी स्वत:चे तरी छायाचित्र काढताना दिसतेच. सेल्फी हा आताशा आपल्या जीवनशैलीचाच भाग झाला आहे. याचे कारण कॅमेरा या उपकरणाची उपलब्धता. तो हातातील फोनमध्ये आला आणि सारे चित्रच बदलले.

पण हे छायाचित्र काढण्याचे वेड काही आजचेच आहे असे नाही. पूर्वी जेव्हा हिंदुस्थानात अन्यत्र कॅमेरा हे यंत्र गुलबकावलीच्या फुलाइतके दुर्मीळ होते, तेव्हाही या बांक्या नगरीमध्ये ‘सूर्यकिरणाच्या योगाने तसबिरी काढण्याचे (क्यामिरे) जिकडेतिकडे’ होते. ही स्थिती होती १८५७च्या बंडानंतरच्या काही वर्षांतली. या कारखान्यांचे अतिशय छान वर्णन गोविंद माडगांवकरांनी केले आहे. ते लिहितात – ‘ह्य़ा (तसबिरी) काढण्याचें यंत्र असतें, त्यास क्यामिरा असें ह्मणतात. त्याच्या योगानें मनुष्यांचे चेहरे, पशूंची चित्रे, घरांचे व देशांचे देखावे वगैरे सर्व काढिता येतात.’

१८६३ मधील हे वर्णन वाचून लक्षात येते की या यंत्राबद्दल तेव्हाच्या सर्वसामान्य व्यक्तींना फारशी माहिती नसावी. म्हणूनच माडगांवकर त्याचे कार्य समजून देतात. खरेच कसे काढीत तेव्हा फोटो?

तर हा क्यामिरा उन्हात ठेवीत. ज्याचे छायाचित्र काढायचे त्याला यंत्रासमोर उभे करीत. त्या वेळी छायाचित्र काढण्यासाठी काच किंवा कागदाचा वापर करीत असत. छायाचित्र काढायच्या वेळी ही खास तयार केलेली काच वा कागद कॅमेऱ्यात घालत. मांडगावकर सांगतात – ‘मग लागलीच त्यावर हुबेहूब तसबीर निघते.’ कॅमेऱ्यातून हुबेहूब छायाचित्र येते याचे त्यांना कोण नवल वाटत आहे!

त्या काळच्या मुंबईत असे किती छायाचित्रकार असतील? मांडगावकर सांगतात – ‘असें चेहरें काढणारें हल्लीं सुमारे तीस-चाळीस असामी सांपडतील. पुष्कळ तरुण गृहस्थांनीं हीं विद्या साध्य करून घेतली आहे. कित्येक आपापल्या घरीं कारखाना घालून आपल्या इष्टमित्रांचे चेहरे काढितात. डाक्तर नारायण दाजी, व हरिश्चंद्र चिंतामण हे हिंदू लोकांत या कामांत हुशार आहेत.’

हे हरिश्चंद्र चिंतामण हे मोठे हिकमती गृहस्थ असावेत. किल्ल्यांत (म्हणजे फोर्टमध्ये) त्यांचा कारखाना (म्हणजे फोटो स्टुडिओ) होता. एवढेच नाही, तर त्यांनी या शास्त्रावर एक लहानसा ग्रंथ लिहिला होता. तोही मराठीत.

आपणांस मिळालेले नवे शास्त्रीय ज्ञान इतरांना स्वभाषेत देण्याची इच्छा, त्याकरिता पदराला खार लावून पुस्तके वगैरे छापण्याची तयारी हे तेव्हाच्या मराठी लोकांचे वैशिष्टय़. त्यासमोर नतमस्तकच व्हायला हवे.

तेव्हाच्या छायाचित्रकारांत कोणी मि. जान्सन् हे गृहस्थ ख्यातनाम होते. माडगांवकर सांगतात – ‘यांनीं घारापुरी, कान्हेरी व दुसऱ्या चमत्कारिक स्थलांची, इमारतींचीं, देवालयांचीं वगैरे या कृतीनें चित्रे काढिलीं आहेत. आणखी या शहरांतील प्रत्येक जातीच्या स्त्रियांचीं व पुरुषांचीं चित्रें काढून महाराणीस नजर करण्याकरिता नेलीं आहेत. या कामांत यांची फारच प्रशंसा करितात.’

हे सर्व वर्णन करताना माडगांवकर आपणांस या क्यामिऱ्याची आणखी एक माहिती सहजच देऊन जातात. ते सांगतात – ‘यांत दुसरी एक खुबी आहे ती असीं कीं, कोणाचीही एक तसबीर काढिली असतां ती वरून दुसऱ्या शेंकडो काढितां येतात.’

खूपच छान मराठी आहे ही. पण त्याहीपेक्षा या सर्व कथनातून दिसते ती त्यांच्यातील प्रबोधनाची ऊर्मी. आज ती भलेही भाबडी वाटते. पण ती खूपच सुंदर आहे.. छानशा कॅमेऱ्याने तिची तसबीर काढून ठेवावी इतकी सुंदर!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 1:04 am

Web Title: vintage mumbai photos mumbai facts mumbai information mumbai pictures
Next Stories
1 खाऊखुशाल : नवलाईची दुनिया!
2 नोटाबंदीचा राज्याला फटका!
3 शेतकऱ्यांना तूर्तास कर्जमाफी नाही
Just Now!
X