करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असल्याने पालिका आयुक्तांनी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश पालिकेच्या यंत्रणेला दिले आहेत. त्याअंतर्गत वांद्रे परिसरातील नाईट क्लब, उपाहारगृहे, मॉल अशा सार्वजनिक ठिकाणी शनिवारी छापे टाकण्यात आले. त्या वेळी वांद्रे पश्चिमेकडील एका कॅफे  व बारमध्ये दोनशे ते अडीचशे जण विनामुखपट्ट्या जमल्याचे आढळून आले. त्यामुळे क्लब व्यवस्थापनावर कारवाई करून ५० हजारांच्या दंड वसूलीसह वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांद्रे पश्चिमेकडील डॉ. आंंबेडकर मार्गावरील एका कॅफे मध्ये शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास छापा घालण्यात आला. त्या वेळी दोनशे ते अडीचशे जण विना मुखपट्ट्या जमल्याचे आढळून आले. तसेच क्लब व्यवस्थापनाने करोनाविषयक नियमांचे कोणतेही पालन केले नव्हते. त्यामुळे विभाग कार्यालयाने या क्लबचालकाविरोधात ही कारवाई केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, शनिवारी अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे, खार परिसरांत शनिवारी विविध मंगल कार्यालये, जिमखाना, क्लब, उपाहारगृहे, उद्याने, धार्मिक स्थळे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, खासगी कार्यालये अशा ठिकाणी छापे घालण्यात आले. विना मुखपट्ट्या असलेल्या लोकांकडून व सामाजिक अंतराचे नियम मोडणाऱ्या २,५०१ लोकांकडून पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला.