औरंगाबादच्या मोतीकारंजा भागात रात्रभर झालेल्या जाळपोळ, दगडफेकीमागे नेमकी काय कारणे आहेत ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासातून सत्य काय ते समोर येईलच. पण हा वाद मोठा होण्यापासून टाळता आला असता. या भागात हिंसाचार भडकला तो अफवांमुळे. वेगवेगळया अफवा पसरल्यामुळे जमाव अधिक हिंसक झाला. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा अफवांमुळे हा वाद मोठा झाल्याचे सांगितले. स्थानिक आमदार अतुल सावे यांनी सुद्धा नागरीकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान आता औरंगाबादमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून संवेदनशील भागांमध्य मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमकही औरंगाबादमध्ये पोहोचली आहे.

औरंगाबादच्या मोतीकारंजा भागात रात्रभर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात जमावबंदी लागू केली आहे. हिंसाचाराचे लोण अन्यत्र पसरु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.