वसईच्या करोना केंद्रातून पसार झालेल्या एका करोनाबाधिताचा मृतदेह गुरूवारी निर्मळ परिसरात आढळून आला. बुधवारी सकाळी हा रुग्ण सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालय करोना केंद्रातू पळाला होता.

वसई पश्चिमेला सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात करोना केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ११ मे रोजी या केंद्रात धनसिंग थापा (६२) हा व्यक्ती उपचारासाठी दाखल झाला होता. बुधवारी वादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा घेत तो रुग्णालयातून पसार झाला होता. तो करोनाबाधित असल्याने खळबळ उडाली होती. त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, गुरूवारी नालासोपारा पश्चिमेच्या निर्मळ येथे या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या संदर्भात वसई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदन प्रक्रियेसाठी पाठिण्यात आला आहे.

करोनामुळे त्याचे निधन झाल्याचे वसई पोलिसांनी सांगितले आहे. यापूर्वी देखील पालिकेच्या वरुण इंडस्ट्री येथील करोना केंद्रातून एक रुग्ण पसार झाला होता.