विरार पूर्व कणेर परिसरात एका गॅरेजच्या गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्यात पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेसंदर्भात विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पूर्व कणेर राई पाडा परिसरात असलेल्या बिपीन राऊत सिद्धेश यांचे गॅरेज आहे. शनिवारी सांयकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास याच गॅरेजच्या सुरक्षारक्षकाची तीन वर्षांची नात आराध्या परिसरात खेळत असताना, गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्याजवळ पोहचली. रॅम्पमध्ये पाणी पाहून ती खेळण्यासाठी पाण्यात उतरली आणि दरम्यान तिचा बुडून मृत्यू झाला.

आराध्या खेळत असताना सुरक्षारक्षक त्याच्या घरात झोपले होते. पावसामुळे या रॅम्पमध्ये सतत पाणी साचलले असते. टाळेबंदी असल्याने गॅरेजही बंद होते. तसेच आसपास कुणी राहत नसल्याने कुणाला तिच्या ओरडण्याचा आवाज देखील आला नाही. बराचव वेळ आराध्या न दिसल्याने जेव्हा तिला शोध घेण्यात आला. तेव्हा ती गॅरेजच्या रॅम्पच्या गाडी धुण्याच्या खड्ड्यात पडलेली आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. या संदर्भात कुणाची तक्रार नाही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.