विरारच्या विजयवल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीप्रकरणी शुक्रवारी संध्याकाळी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात रुग्णालयाचे व्यवस्थापक आणि डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्राथमिक चौकशीत या दुर्घटनेसाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

विजयवल्लभ रुग्णालय आग दुर्घटनेचा तपास मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात दुर्घटनेसाठी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०४, ३३७ आणि ३३८ अन्वेय निष्काळजीपणा आणि इतर व्यक्तींच्या जिवितास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रुग्णालयाचे नव्याने अग्निसुरक्षा लेखापरिक्षण, विद्युत सुरक्षा लेखापरिक्षण केले जाणार असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. यानंतर जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर आणखी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखीलयाप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत,” अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.

मृतांची संख्या १५ वर –

आगीत जखमी झालेल्या नीरव संपत (२१) या रुग्णाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना संध्याकाळी उशीरा मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेल्या रुग्णांची संख्या १५ एवढी झाली आहे.

विजयवल्लभ रुग्णालय दुर्घटनेतील १५ मृतांची नावे –

१) उमा सुरेश कंगुटकर, (स्त्री/ ६३)

२) निलेश भोईर, (पु/३५)

३) पृथ्वीराज वल्लभदास वैष्णव (पु/६८)

४) रजनी कडू, (स्त्री/ ६०)

५) नरेंद्र शंकर शिंदे (पु/ ५८)

६) जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (पु/ ६३)

७) कुमार किशोर दोशी (पु/ ४५)

८) रमेश उपयान (पु/५५)

९) प्रवीण शिवलाल गौडा (पु/ ६५)

१०) अमेय राजेश राऊत (पु/ २३)

११) शमा अरुण म्हात्रे (स्त्री/ ४८)

१२) सुवर्णा पितळे (स्त्री/ ६४)

१३) सुप्रिया देशमुख (स्त्री/ ४३)

१४) शिवाजी पांडुरंग विलकर (पु ५६)

१५) नीरव संपत (पु/२१)